लेकीचा सौदा करणाऱ्या मातापित्यांच्या ‘डाव’ पोलिसांनी उधळलातीन मुलांच्या पाठोपाठ चौथी मुलगी झाल्याने त्या पोटच्या लेकीला दीड लाखांमध्ये विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील दाम्पत्यासह दलाल आणि दोन नातेवाईकांचा ‘डाव’ ठाणे शहर पोलीस दलाच्या ठाणे गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. यावेळी सहा जणांना अटक करून ‘त्या’ ३ ते ४ दिवसांच्या मुलीला सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भिवंडीतील वकील अन्सारी व मुमताज अन्सारी हे त्यांची ३ ते ४ दिवसांपूर्वी जन्मलेली मुलगी दीड ते दोन लाख रूपये किंमतीस विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत, अशी बातमी ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी बनावट खरेदीदार बनुन नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. त्या नवजात बालिकेचे आई-वडील व मध्यस्थी महिला यांनी नवजात बालिकेचा दीड लाखात सौदा ठरविल्यावर त्यांना ठाण्यातील कॅसल मिल नाका येथील स्वागत हॉटेल, येथे नवजात बालिकेस घेऊन येण्यास सांगितले होते.

त्यानुसार शनिवारी दुपारी त्या हॉटेलमध्ये सापळा रचून ठरल्याप्रमाणे नवजात बालिकेचे विक्रीकरिता आलेल्या व्यक्तींनी बनावट खरेदीदार बनुन गेलेल्या पोलीसांकडुन दीड लाखांची रक्कम स्विकारून त्यांच्याकडील नवजात बालिकेला सुपुर्द करताच त्यांना ताब्यात घेत, त्यांचा डाव हाणून पाडला. तर भिवंडी शांतीनगर मधील रिक्षाचालक वकील शकील अन्सारी (३७) त्याची पत्नी मुमताज या दाम्पत्यासह मुमताज हिचे बहीण – भाऊ कायनात रिझवान खान (३०) आणि मुझम्मिल रिझवान खान (१८) रा. मुंब्रा तसेच दलाल झिनत रशिद खान (२२) व वसीम इसाक शेख (३६) रा. मुंब्रा अशा सहा जणांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७० सह द जुवेनाईल जस्टीस केअर अॅन्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स अॅक्ट २०१५ चे कलम ८०,८१ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना राबोडी पोलिसांच्या हवाली केले.

विक्री करण्यासाठी आणलेल्या नवजात बालिकेचा जन्म हा ४ डिसेंबर २०२१ रोजी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय येथे झालेला असुन, तिला घटनास्थळी ताब्यात घेतल्यावर पुढील सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आले आहे, पुढील तपास राबोडी पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments