चंद्रकांत पाटलांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज, म्हणाले ‘जनतेच्या मैदानातही…’



महाविकास आघाडी सरकर आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. राज्य सरकार आपली कर्तव्य नीट करत नाही म्हणून राज्यात अराजकता पसरत आहे. महिला सुरक्षा, परिक्षेतील घोटाळे, भ्रष्टाचार, ओबीसी आरक्षण, यावरून सरकारवर टीका होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

विरोधकांनी नामोहरम करू नये, यासाठीच न घडलेल्या घटनांचे दाखले देत आमच्या 12 आमदारांना निलंबित केलं आहे. 170 आमदारांचा पाठींबा असल्याचं सांगत असले, तरीही यांना आपल्याच आमदारांविषयी देखील विश्वास वाटत नाही. म्हणूनच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीचा नियम डावलून होणार आहे. नियम समितीचे नियम डावलण्यात आल्यास त्याचा आम्ही तीव्र निषेध करू, असं पाटील म्हणाले आहेत.


महाराष्ट्रातील समर्थ आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून जास्तीत जास्त चर्चा करण्यावर आमचा भर असेल, त्याचसोबत राज्यासमोर असणाऱ्या ज्वलंत विषयावर आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सर्व आयुधांचा अधिकाधिक वापर करून ही आवाज उठवू. हे सरकार लोकशाहीच्या नव्हे, तर दडपशाहीच्या पायावर उभं आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, पाटील यांनी यावेळी पावसाळी अधिवेशनाची आठवण काढली आहे. ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच या अधिवेशनात देखील चर्चा होऊ दिली नाही, तर विधानसभेबाहेर जनतेच्या मैदानात चर्चा करण्याची देखील आमची तयारी आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments