करमाळा/प्रतिनिधी : तालुक्यातील वडशीवणे येथे सोमवारी रात्री कुत्र्यावर झालेला हल्ला हा बिबट्यानेच केला असल्याचे समोर आले आहे. बुधवारी (ता. ८) वनविभागाने या भागातील ठसे घेतले असून त्यावरून हा हल्ला बिबट्याचा असल्याचे दिसत आहे, असे वन विभागाचे वन निरीक्षक एस. आर. कुरुले यांनी सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील वडशीवणे येथे सोमवारी बिबट्यासदृश्य प्राण्याने काका व्हरे यांच्या वस्तीवर असलेल्या कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार मंगळवारी समोर आला होता. त्यानंतर बुधवारी वनविभागाने येथील परिसराची पाहणी केली. तेथे सापडलेले ठसे, हल्ला केलेले वर्णन व यापूर्वी झालेला हल्ला यावरून हा हल्ला बिबट्याचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
वडशिवणे येथे गावापासून एक किलोमिटरवर हा हल्ला झाला होता. शेटफळनंतर हा करमाळा तालुक्यातील चौथा हल्ला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन वन निरीक्षक कुरुले यांनी केले आहे.
0 Comments