बार्शी/प्रतिनिधी:
तालुक्यातील मौजे ताडसौदणे येथील आंगणवाडीसाठी करण्यात आलेले बांधकाम निकृष्ठ आहे, असा आरोप करत संबंधित अभियंत्यास निलंबित करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीसाठी गावातील जागरूक नागरिक दत्तात्रय पाटील हे गेली चार दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून मौजे ताडसौदणे येथे सन 2019-20 मध्ये अंगणवाडीसाठी बांधकाम करण्यात आले परंतु या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून सदरचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे बांधले आहे. सदरची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीचा वापर करण्याच्या आधीच याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदरच्या बांधकामाची पाहणी व तपासणी करणारे अभियंता यांच्या मुलानेच हे बांधकाम केले आहे, असा आरोप देखील उपोषणकर्ते दत्तात्रय पाटील यांनी केला आहे. संबंधित अभियंता यांना निलंबित करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी उपोषणकर्ते दत्तात्रय पाटील यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. पाटील यांचे आमरण उपोषणास चार दिवस पूर्ण झाले असून त्यांची प्रकृतीही खालावत आहे, परंतु निष्ठुर प्रशासनास मात्र पाझर फुटेना असे चित्र दिसत आहे.
0 Comments