मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या मंत्र्याची खुर्ची धोक्यात?


 
काँग्रेसमध्ये सध्या विविध हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे प्रचंड वेगात काही घडामोडी घडताना दिसत आहेत. विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन  सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात 28 डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एका नेत्याला उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. पण या अध्यक्षपदावरुनही काँग्रेसमध्ये अंतर्गत विविध घडामोडी घडत आहेत.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल त्याबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी  निर्णय घेतील. काँग्रेस उद्या उमेदवार घोषित करेल, अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे विदर्भातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना कदाचित ऊर्जामंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागण्याची शक्यता आहे. कारण तशा घडामोडी काँग्रेसमध्ये घडताना दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात वाद पेटल्याची चर्चा आहे. या अंतर्गत वादाचे पडसाद आता जाहीरपणे उमटताना दिसत आहेत. काँग्रेसच्या SC या विभागाच्या अध्यक्षपदावरुन नितीन राऊत यांची गच्छंती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे त्यानंतर आता नितीन राऊत यांचं ऊर्जामंत्रीपद काढून घेण्याच्या चर्चा आहेत. पण या सर्व वादावर नाना पटोले यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. काहीजण आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच मला ऊर्जामंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही, असंही पटोले म्हणाले. “आमच्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होतोय. पण मला मंत्री व्हायची वेळ जरी आली तरी मी ऊर्जा खातं कधी घेणार नाही”, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.



हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू?
राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनानंतर पुढच्या काही दिवसांत मंत्र्यांच्या कामांची यादी घेऊन दिल्लीला जाणार आहेत. तिथे काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ज्या मंत्र्यांनी समाधानकारक काम केलंय त्यांनाच मंत्रिपदी ठेवलं जाणार आहे. काँग्रेसच्या जवळपास दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कोणत्या मंत्र्याला ठेवायचं आणि कुणाला डच्चू द्यायचा याबाबतचा निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार त्या मंत्र्यांच्या कामकाजांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं देखील वृत्त आहे.

महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 28 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे हे मतदान आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. खरंतर आवाजी मतदानावर भाजपचा आक्षेप होता. यासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीकडे 47 शिफारसी गेल्या होत्या. पण समितीने त्या सगळ्या शिफारसी फेटाळत आवाजी मतदानाने निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. आता अध्यक्षपदासाठी खूप रस्सीखेच सुरु आहे. अध्यक्षपदासाठी 27 डिसेंबरला अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान पार पडेल.

Post a Comment

0 Comments