…तर आदित्य ठाकरेंनी तत्काळ राजीनामा द्यावा


 
वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर या कुटुंबातील एका मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. यावरूनच आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे  यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महापालिका आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका कुटुंबाचा बळी गेला आहे. आता मुंबईचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जरा लाज उरली असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असं नितेश राणे म्हणाले.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बीडीडी चाळीतील एका घरात सिलिंडर स्फोट झाला होता. त्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमींना सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र नायर रुग्णालयात त्यांना तत्काळ उपचार मिळाले नसल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता.

या प्रकरणात पालिकेने एक डॉक्टर, एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित केले. या प्रकरणात पालिकेने चौकशी समितीही नियुक्त केली आहे. या कुटुंबातील पाच वर्षांचा मुलगा वाचला असून त्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार महिन्यांच्या बालकाचा एक डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ डिसेंबरला २७ वर्षीय आनंद पुरी यांचा मृत्यू झाला होता, तर आज २५ वर्षीय विद्या पुरी यांचा मृत्यू झाला. त्या या स्फोटात ५० ते ६० टक्के भाजल्या होत्या.

Post a Comment

0 Comments