गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेकीचा संजय राऊत यांनी केला निषेध


नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र या घटनेचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे.  साहित्य संमेलनात अशाप्रकारचे कृत्य करणे चुकीचे आहे. पुराव्यासह चुका दाखवायला हव्यात. शिवाय समोरासमोर चर्चा करायला हवी, अशाप्रकारे शाईफेक करणे चुकीचे आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.


 
या संपूर्ण घटनेचा मी निषेध करतो. लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित दैनिकाचे गिरीश कुबेर हे ज्येष्ठ पत्रकार संपादक आहेत. त्यांनी जे काही लिखाण केले किंवा करत आहेत, त्याविषयी मतभेद असू शकतात. मधल्या काळात त्यांच्या पुस्तकावरून वाद झाला होता तो मी ही वाचला. मुळात त्यांनी काय लिहिलंय हे लोकांनी वाचले आहे. पण न वाचता त्यांच्यावर अशा प्रकारे शाईफेक करणे आणि ते ही मराठी साहित्य संमेलन सुरू असताना असे कृत्य करणे हे कोणालाही मान्य होणार नाही. त्यांनी जे लिहिले त्यांच्या पुस्तकात याप्रकरणी काही लोकांनी गुन्हे दाखल केले आहेत. काहींनी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात कायदेशीर कारवाई होईल. साहित्य संमेलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सर्वांत मोठे व्यासपीठ असते, असे संजय राऊत म्हणाले.

Post a Comment

0 Comments