माढा/प्रतिनिधी:
उजनी जलाशयाच्या विस्तारित परिसरामध्ये स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल सुरू झाली आहे. परदेशाहून हजारो किलोमीटरचा प्रवास करून, उजनी जलाशयाच्या परिसरात स्थलांतर करणाऱ्या, गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे आकर्षण ठरणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो, आता पट्टकदब हंसाचेही आगमन झाले आहे. हिवाळ्याच्या एक महिन्या आधीच स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पक्षीप्रेमींसाठी सध्या ही पर्वणी ठरत आहे.
हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या नितळ पाण्यात नक्षीदार
असे पट्टकदब हंसा उजनीच्या जलाशयांमध्ये येऊन दाखल झाले आहेत. उजनी जलाशयाच्या काठावरील हिरवळीवर हे नजाकतदार हंस दिमाखदार चालीने वावरताना पक्षीप्रेमींना आकर्षण ठरत आहेत. पांढरी शुभ्र डोके, त्यावर दोन काळे समांतर पट्टी ही या हंसाना ओळखण्याच्या खुणा आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराचे शरीर असलेले या हंसातील चोच गुलाबी आहे व त्यांचे पाय नारंगी पिवळे पाय असतात. राखी रंगाच्या पंखावर काळे पट्टे असतात. शेपटीचे मूळ व टोक पांढरे शुभ्र असतात. यांना कादंबहंस या नावानेही ओळखतात. यांना पाहण्यासाठी पर्यटकांची उजनीच्या जलाशयात गर्दी होत आहे
जलाशयातील पाणी कमी झाल्यानंतर त्यांच्या खाण्यात शेवाळे, पाणवनस्पती, विविध किडे उपलब्ध होत असल्याने ही त्यांच्यासाठी मेजवानी ठरते. शेकडोंच्या संख्येने पक्षी पाण्यात दाखल झाल्याने त्यांच्या पाण्यातील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात. भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्र मन मोहून टाकतो. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असूनही सरकारकडून अद्याप हा भाग दुर्लक्षित आहे.
हिवाळ्याच्या सुरुवातीला पट्टकदंब भारतात येतात सैबेरिया, मध्य आशिया, तिबेट , लडाख या पाच हजार फूट उंचीवरील ठिकाणच्या पाणवठ्यावर त्यांचे प्रजनन होते. उजनी जलाशयावर धाकट्या, नकट्या, शेंडी बदक, लालसरी , गडवाल, चक्रवाक, धाकटे मराल , तरंग ही बदकेही आवर्जून हजेरी लावतात. हिवाळ्याच्या प्रारंभी पट्टकदंब हंस अनेक छोट्या मोठ्या थवेने उजनीवर येऊन दाखल झाले आहेत.
0 Comments