तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये नेऊन तरुणाने तिचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारत असून धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून लवकरच युवतीचा जबाब नोंदवला जाणार आहे. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली.
फरिदाबादच्या एनआयटी 5 ई रेल्वे रोड भागात असलेल्या हॉटेलच्या रुममध्ये थांबलेल्या युवकाने सोबत असलेल्या युवतीचा गळा चिरला. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरुन पसार झाला होता. त्याच्या आयडीवरुन त्याचं नाव यश अग्रवाल असल्याची माहिती मिळाली असून तो एसजीएम नगरचा रहिवासी आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण-तरुणी चालत हॉटेलमध्ये आले होते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी चेक-इन केले. त्यांनी रुम बूक केली. त्यानंतर दुपारी दोन वाजता युवक धावत-पळत हॉटेलमधून निघून गेला.
त्याला या अवस्थेत पळताना पाहिल्याने हॉटेलच्या स्टाफने त्याची रुम चेक केली, तेव्हा तरुणी गॅलरीत येऊन रक्तबंबाळ अवस्थेत आरडाओरड करत होती. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. तिने दोन्ही हातांनी गळा धरुन ठेवला होता.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. रुग्णवाहिका बोलावून तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, मात्र ती जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कोणत्या हत्याराने तिचा गळा चिरला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हॉटेलच्या खोलीतही कुठलं शस्त्र पोलिसांना सापडलेलं नाही. कुठल्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि युवकाने टोकाचं पाऊल उचललं, हे तिच्या जबाबानंतरच समजेल, असं पोलिसांनी सांगितलं.
0 Comments