शिवसेना पदाधिकाऱ्यावर चॉपरने हल्ला; प्रकृती चिंताजनक !


 
निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर चॉपरने हल्लाकेल्याची खळबळजनक घटना रविवारी अशोकनगर परिसरातील जाधव संकुल भागात घडली आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. बहुचर्चित अशा आंनदवल्ली खून प्रकरणाचा नुकताच उलगडा झाला. याप्रकरणी तब्बल 20 जणांना तुरुंगाची हवा खावी लागतेय. त्यात बिल्डरांपासून ते दोन कुख्यात गुंडांचाही समावेश आहे. त्यानंतर झालेल्या परप्रांतीय कामगाराचा झालेला खून. याप्रकरणीही पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. आता त्याच नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

शिवसेना पदाधिकारी श्याम फर्नांडिस हे दोघा भावांचे वाद सोडवण्यासाठी गेले होते. तेव्हा संशयित संतोष ढमाळ याने फर्नांडीस यांच्यासह सागर जाधव आणि राजू उगले यांच्यावर चॉपरने हल्ला केला. त्यात फर्नांडीस यांच्यासह तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशोकनगर परिसरातील जाधव संकुल भागात ही घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये संशयित संतोष ढमाळवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

दोघा भावांचे वाद सोडवण्यास गेल्यावरून अंतर्गत वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका राजकीय पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ आहे. वातावरण खराब चिघळू नये याची दक्षता घेणे पोलिसांनी सुरू केले आहे.

Post a Comment

0 Comments