बेकायदा जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; टेम्पोसह पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त


अक्कलकोट/प्रतिनिधी: 

बेकायदा जनावरांची वाहतुक केल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एक अल्पवयीन आहे. गुरुवारी (ता. ४) पहाटे २ वाजताच्या सुमारास हिरोळी बाँर्डर येथे हि कारवाई करण्यात आली असून यामध्ये टेम्पो व जनावरांसह सहा लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल सिताराम राउत यांच्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ४) गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (ता. ३) रात्री ११ ते गुरुवारी (ता. ४) पहाटे ५ वाजेपर्यंत हिरोळी बाँर्डर नाकाबंदी येथे ड्युटीवर असताना एका टेम्पोत विनापरवाना जनावरे असल्याची दिसली.

त्यात १० पांढ-या रंगाचे बैल व दोन रेडे दाटीवाटीने उभे करुन त्यांचे चारापाण्याची सोय न करता जनावरास क्रुरतेने वागणुक देउन कत्तलीच्या इराद्याने घेउन जात असताना दिसली. यात वसीम जाफर बेपारी (वय २३) व मैंदर्गी (ता अक्कलकोट) येथील एक अल्पवयीन मुलगा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टँम्पोमध्ये चालवलेल्या या जनावरांच्या मालकी हक्कांबाबत व विक्री करणेबाबत तसेच जनावरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व वाहतुक परवाना अशी कोणतीच कागदपत्रे त्या दोघांकडे नव्हती.

यामध्ये पाच लाखाचा टेम्पो व एक लाख ८० हजार रुपयांची जनावरे असा सुमारे सहा लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला आहे. दोन आरोपींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सुधारणा २०१५ च्या कलम ६ व ९ सह प्राण्यांना क्रुरपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१) (जी), ११(१) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments