मीडियाच्या नावाने भुई बडवून काय होणार?सध्या कोरानाचा नवा व्हेरियंट अनेकांच्या मनात धास्ती उत्पन्न करत आहे. माध्यमांमध्ये याच्या बातम्या येत आहेत याचे अनेकांना दुखणे आहे. हा व्हेरियंट आल्याने माध्यमांना आनंद झाला आहे, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. २४ तासांचे गुऱ्हाळ चालविण्यासाठी ऊसच लागतो आणि रसाळ ऊसच लागतो असे नाही. कधी कधी एरंडाचे गुऱ्हाळही माध्यमांमध्ये चालते. इलेक्ट्रॉनिक मीडियात ते जास्त चालते. भुरट्या बातम्याही अशा चालवल्या जातात की, त्या जीवन मरणाचा प्रश्नच आहे. त्यामुळे सरसकट सगळ्याकडेच बघण्याकडे एकप्रकारची हेटाळणी आली आहे. 

सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट आफ्रिकेसह ११ देशांमध्ये आढळला आहे. या अकरा देशांपैकी तीन देशांतून सध्या आपल्या देशात विमानसेवा सुरू आहे. यामध्ये जर्मनी, ब्रिटन आणि नेदरलँड या देशांचा समावेश आहे. अजूनही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत निर्बंध आणलेली विमानसेवा पुर्ववत झालेली नाही. अशा वेळी नवा व्हेरियंट हा सात आंधळे आणि हत्तीसारखा नक्कीच नाही. दुधाने इतके तोंड पोळलेय की हा व्हेरियंट ताक असेल तर तो फुकूनच घेतला पाहिजे. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की तो इतकासा धोकादायक नाही. पण वेगाने पसरू शकतो. गेल्या दोन लाटेत पार उद्ध्वस्थ झालेल्या समाजजीवनाला तिसरा लॉकडाऊन परवडणारा नाही. अशा काळात पायलीला पासरीभर असलेल्या मेनस्ट्रीम माध्यमांनी, हजारोंनी असलेल्या डिजीटल चॅनेल्स, वेबसाइट आणि व्हॉट्सॲप वीरांनी या व्हेरियंटची माहिती पसरावायला सुरू केली आहे. सहाजिकच लोक घाबरणार. पण लोक घाबरून काय करतात? ते मास्क वापरत नाहीत, हात धूत नाहीत आणि कुठलाही नियम पाळत नाहीत. डिस्कव्हरी चॅनेलवर बघितलेल्या आफ्रिकेत आलेला हा व्हेरियंट आपल्यापर्यंत कसा येईल अशा अविर्भावात लोक माध्यमांतील बातम्यांची खिल्ली उडवत आहेत. मागी वर्षी जानेवारी महिन्यात चीनमधील कोरोना आपण केवळ तो एखादा हॉलिवूडपट आहे अशा रितीने पाहत होतो. त्याच्या चर्चा करत होतो. त्यानंतर मोदीजींनी वाजत गाजत लॉकडाऊन लावला, त्यांचे मंत्री रामायण, महाभारत बघायला सांगू लागले, स्वत: बघू लागले. लोक भिकेला लागत गेले. टाळ्या, थाळ्या वाजवल्या, मेणबत्त्या पेटवल्या. अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले. आपल्या पुढ्यात तडफडून जाणारे जीव पाहून अनेकजण आजही नीट जगू शकत नाहीत. आपल्याच घरातील अनेकांना नीट उपचार मिळत नव्हते. कोरोनाबाधित आढळल्यानंतर समोर भयंकर स्वप्न पाहून भले भले गारठून जात होते. असा सगळा अनुभव गाठीशी असतानाही लोक जर या व्हेरियंटच्या बातम्यांची खिल्ली उडवणार असतील तर देवही त्यांचे भले करणार नाही. मुळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार हात धुवा, अंतर राखा, सुरक्षित रहा असे सांगत होते. हे सांगायची पाळी आपण आणत होतो. तरीही त्यांची खिल्ली उडवत होतो.  

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत केंद्र सरकार लवकर जागे झाले आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांत वेगाने पावले उचलायला सुरू केले आहेत. गेल्या चार दिवसांत हा व्हेरियंट ११ देशांत पोहोचला आहे. त्यामुळे तो घरापर्यंत यायला किती वेळ लागेल ते आपणच बघावे. आता तरी शहाणे व्हावे. केवळ मीडियाच्या नावाने भुई बडवून काय होणार?

लेखन- बाळासाहेब पाटील

Post a Comment

0 Comments