पंढरपूर/प्रतिनिधी:
कार्तिक यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत सर्व संबधीत विभागांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिले.
कार्तिक यात्रेनिमित्त प्रशासनातर्फे करण्यात येणारी तयारी व आपत्ती व्यवस्थापन केंद्रावरील कामकाजाबाबत आढावा प्रांत कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आला. यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर, प्रशांत पाटील, स्वप्निल रावडे, राजेश चव्हाण, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते.
(Advertise)
यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, कार्तिक वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीनी कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे ही त्यांनी सूचित केले.
तसेच पत्राशेड व दर्शनरांगेमध्ये बॅरेगेटींगची व्यवस्था, भाविकांच्या पायाला खडी व वाळू लागणार यासाठी मॅटची व्यवस्था, दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिशा दर्शक फलक, आरोग्य सुविधा आदी व्यवस्थेची पाहणी करुन आवश्यक ती कार्यवाही करावी . 65 एकर एकर परिसरात प्लॉटचे वाटप करताना वारकरी भाविकांची संख्या मर्यादित राहिल याची दक्षता घ्यावी. तसेच मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था, अखंडीत व सुरक्षित विद्युत पुरवठा सुरु राहिल याची दक्षता घ्यावी. तसेच अगिनशमन व्यवस्थेसह इतर आवश्यक सुविधांची पाहणी करुन तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.
तसेच नगरपालिकेने नदीपात्रात स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहिल याची दक्षता घ्यावी. शहरात कोविड-19 संसर्ग रोगप्रतिबंधक औषधाची फवारणी , संभाव्य गर्दीच्या दृष्टीने शहराबाहेर मोकळया जागेवर वाहन पार्किग व्यवस्था, शहरातील दर्शनी भागात भाविकांच्या सुविधेसाठी दिशा-दर्शक फलक, प्रदक्षिणा मार्गाची दुरुस्ती व स्वच्छता आदी बाबत सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या. तसेच यावेळी नगरपालिका पंढरपूर आरोग्य विभाग व इतर अनुषंगिक विभागाने वारी च्या अनुषंगाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना त्यांनी दिल्या.
0 Comments