महाविकास आघाडीला मोठा झटका


लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीअंती अवैद्य ठरवलेले भाजपच्या नऊ उमेदवारांचे अर्ज सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकाकडे झालेल्या सुनावणीत वैद्य ठरले आहेत. या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्णाण झाले आहे तर महाविकास आघाडीचं  टेन्शन वाढलं आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या 21 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं सर्व 19 जागांसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र 10 ऑकटोबर रोजी झालेल्या अर्जाच्या छाननीत भाजप उमेदवारांचे सर्व अर्ज अवैद्य ठरविण्यात आले होते. या निर्णयाविरुद्ध भाजपनं विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे अपील केलं होतं.

या अपिलाची सुनावणी होऊन नऊ जणांचे अर्ज वैद्य ठरले आहेत. काँग्रेसच्या राजकीय दबावात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद करून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा आरोप करत याबाबत राज्यपालांकडे देखील भाजपनं तक्रार केली होती. या निर्णयामुळं आता भाजपच्या गोटात मात्र आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. सत्य परेशान हो सकता हैं पराजित नहीं, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार रमेश कराड यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमचे अर्ज बाद कऱण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करून लोकशाहीचा खून केला आहे. या प्रकरणी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत. तसेच सरकारी यंत्रणेच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

भाजप पदाधिकाऱ्यांनी पुढे म्हटलं होतं की, या संदर्भात आम्ही तक्रारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता ते फोन घेण्यास तयार नव्हते. या प्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. हा एक षडयंत्राचा भाग आहे आणि या षडयंत्रात जो कुणी सहभागी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments