बार्शी! वगळलेल्या ४ मंडलसह सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : भाजपा नेते राजेंद्र मिरगणे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना वगळलेल्या ४ मंडलाचा पुर्नसमावेश करून तालुक्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महाहौसिगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात मिरगणे यांनी, बार्शी तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्ध व ऑक्टोंबर महिन्याच्या पुर्वाधामध्ये अतिपर्जन्यवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील उभी व काढणीला आलेली सोयाबिन, उडिद, मुग, तुर, कांदा, डाळींब, द्राक्षे आदी फळबागांचे व शेतजमिनीचे अपरीमित नुकसान झाले. मात्र या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सुरू केलेल्या पंचनामा मोहिमेत तालुक्यातील वैराग, सुर्डी, नारी, खांडवी या मंडलातील ४६ गांवे वगळण्यात आली आहेत. वास्तविक पाहता सर्व तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला असताना चार मंडलातील गांवे वगळली गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. 

(Advertise)

२४ तासात ६५ मि.मि. पाऊस झाल्यास त्यास अतिवृष्टी समजावी असा शासन निर्णय असला तरी वरील ४ मंडलामध्ये दररोज ३० मि.मि. ते ६२.५ मि.मि. अशी सलग ७ दिवस अतिवृष्टी झाल्याची नोंद शासन दप्तरी आहे. एकतर या संपुर्ण पावसाळ्यामध्ये बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने तालुक्यातील सर्व पाझर तलाव, बंधारे, ल.पा.तलाव, मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वहात आहेत. तसेच शेतातील छोटे छोटे नालाबांध सुध्दा भरलेले आहेत त्यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता संपलेली आहे. 

आजही पर्जन्यमापन केंद्रे ही एका मंडलात एकच असल्याने व त्यापैकी काही बंद असल्यानेही हा अन्याय होत आहे. तसेच सध्या सॅटेलाईट, गुगल इ. अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असताना फक्त बंद पडलेल्या पर्जन्यमापन यंत्रावर विसंबून राहणेही चुकीचे आहे. वरील परस्थितीमुळे या ७ दिवसात सलग अतिवृष्टीमुळे शेतीचे व पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे ६७ मि.मि. ऐवजी ६२.५ मि.मि. पाऊस असे तांत्रिक कारण दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येऊ नये. 

तसेच ४ मंडलांना वगळल्यामुळे त्यामधील गावातील नुकसान झालेल्या पिकांचे विमा देताना विमा कंपन्या नकारात्मक भुमिका घेऊ शकतात व याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसेल. तसेच बार्शी-उस्मानाबाद व बार्शी-सोलापूर या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाची कामे होताना कंत्राटदार बांधकाम कंपन्यांनी रस्त्याच्या दुर्तफा शेतामधील पिकातून वाहतूक केली आहे. तेथे बांधकाम साहित्य ठेवले आहे व मातीच्या ताली टाकल्या आहेत त्यामुळेही शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही संबंधित कंत्राट कंपनींनी नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. या सर्व बार्बी लक्षात घेता तालुक्यातील शेतकन्यांचे झालेले सर्वांकश गंभीर नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन व तालुक्यात सर्व मंडलातील सर्व गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याबाबत कार्यवाहीस्तव आदेश देण्याची मागणी मिरगणे यांनी केली.

Post a Comment

0 Comments