वैराग/प्रतिनिधी:
गेल्या दहा वर्षापासून दारू विक्री करणाऱ्या वैराग मधील भारत सोलनकर याचे मनपरीवर्तन करण्यास वैराग पोलीसांना यश आले आहे. त्याने दारू विक्री बंद करुन किराणा मालाचे दुकान सुरू केले आहे. विशेष म्हणजे गांधी जयंती दिवशी हा उपक्रम सुरू झाल्याने जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचे ऑपरेशन खऱ्या अर्थाने परिवर्तन ठरू लागले आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस विभागामध्ये ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री यापासून परावृत्त करून त्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी पार पाडण्यात येत आहे. आव्हानात्मक संकल्पना " ऑपरेशन परिवर्तन" जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी प्रथम ७१ हातभट्टी निर्मिती ठिकाणां वर कारवाई करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले.अवैद्य हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांचे आर्थिक सामाजिक,मानसिक ,कौटुंबिक दुष्परिणाम याबाबत जागृती करून हातभट्टी निर्मिती व विक्री व्यवसायांमध्ये गुंतलेल्याचे मनपरिवर्तन करत त्यांना वेगवेगळे व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन दिले आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये ऑपरेशन परिवर्तन ही संकल्पना प्रत्यक्षात काम करत आहे. त्याचाच परिपाक म्हणून वैराग (ता. बार्शी )येथील हातभट्टी दारू व्यवसायांमध्ये गुंतलेले भारत सोनलकर यांनी हातभट्टी दारू विक्री व्यवसाय हा पूर्णतः बंद केला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर,वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहिर व सपोनि महारुद्र परजने आणि पोलीस पथकाच्या मार्गदर्शन व पाठपुराव्यामुळे आज दिनांक "राष्ट्रपिता महात्मा गांधी "यांचे जयंतीचे औचित्य साधून भारत सोनलकर यांनी सन्मानपूर्वक किराणा दुकानाचा शुभारंभ केला आहे.
0 Comments