२७ ऑक्टोबर २०१८ रोजी माचणूर येथील प्रतीक शिवशरण हा बालक शाळेच्या तासावरून घरी येऊन जेवण करून मित्राबरोबर फिरावयास गेला असता तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडिलांनी तपास घेतला असता त्याचा मृतदेह उसाच्या फडात पाच दिवसानंतर आढळून आला. पोलीस तपासात त्याचा मृत्यू नरबळी झाल्याचा संशय व्यक्त करून आरोपी पकडण्यास विलंब होत असल्याप्रकरणी नागपूर-रत्नागिरी महामार्गावर माचणूर येथे ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर जनहित शेतकरी संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते.
तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, स्व. आ. भारत भालके यांच्याबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर, विजयसिंह मोहिते पाटील यांनी शिवशरण कुटुंबीयांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या होत्या. अखेर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या प्रकरणात मुळाशी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
प्रकरणी नानासाहेब डोके व त्यांच्या इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांनी प्रतीकची नरबळी प्रकरणातून हत्या केल्याची कबुली दिली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. गेले काही दिवस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा पुणे येथे काल रात्री मृत्यू झाला. आज शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहावर माचणूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
0 Comments