सोलापूर जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बार्शीत प्रवाशांची गैरसोय


ऐन दिवाळीच्या दिवसात एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. गुरुवारी (दि. २८) सकाळपासूनच बार्शी बस स्थानक बंद झाल्याने या बसस्थानकातून कुठलीही बस बाहेर गेली नाही तर बाहेरून येणाऱ्या गाड्यांना बस स्थानका बाहेरूनच परतावे लागले. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी संप पुकारण्यात आल्याने एसटी बसची चाके ही थांबली आहेत.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य राज्य शासनाच्या सेवेत विलगीकरण करून घ्यावे. यामुळे राज्य शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना प्रमाणे राज्य राखीव परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही आपल्या कामाचा योग्य असा मोबदला मिळेल, अशी महत्वपूर्ण मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच कामगार करारानुसार कर्मचाऱ्यांना सर्व फायदे त्वरीत मिळावेत. 

शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर, २०१९ पासून २८ टक्के महागाई भत्ता दिला जात असून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना केवळ १२ टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. याबाबतही राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. ३० जून, २०१८ च्या पत्रानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढीचे दर, घरभाडे भत्ता यात वाढ करूनही तो दिला गेला नाही. तसेच त्याची थकबाकी ही दिली गेली नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम १२ हजार ५०० रुपये दिला जातो. मात्र, दोन वर्षांपासून मागणी करूनही आर्थिक अडचणीचे कारण सांगून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम ही दिला जात नाही.

Post a Comment

0 Comments