सोलापूर जिल्ह्याला लस कमी पडणार नाहीकोरोना लसीकरणावर भर द्या; पालकमंत्री दत्तात्रय भरणे



सोलापूर/प्रतिनिधी: 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्याला कोरोनाची मुबलक लस मिळत आहे. आणखी जादा लस मिळण्यासाठी प्रयत्नशील असून संबंधित यंत्रणेने लसीकरणावर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केल्या.

नियोजन भवन  येथे कोरोना रुग्णांच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते. 
(Advertise)

श्री. भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्याला मागील आठवड्यात दोन लाख लस मिळाली होती. शुक्रवारी पावणेदोन लाख लस मिळाली आहे. मेगा लसीकरणामुळे आपणास जादा लस मिळत आहे. नागरिकांनी शांततेत लस टोचून घ्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ठ काम केले असून एका दिवसात तब्बल एक लाख 40 हजार लस देण्यात आली. कोरोनाचा पहिला डोस 13 लाख 90 हजार 662 नागरिकांना (38.9 टक्के) तर दुसरा डोस 4 लाख 79 हजार 578 नागरिकांना दिला आहे. जादा लस मिळाली तर सोलापूर जिल्ह्यात एका महिन्यात सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या कमी होत आहे, म्हणून कोणीही गाफील राहू नये. जिल्ह्यातील पाच तालुक्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रूग्णसंख्या कमी होण्यास मदत होत आहे. पॉजिटिव्ह दर 2.3 टक्के झाला आहे. सोलापूर शहरात रूग्णसंख्या कमी असली तरी गाफील न राहता कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 
(Advertise)

मुबलक ऑक्सिजन 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनसाठी खूप कष्ट घ्यावे लागले. मात्र दुसऱ्या लाटेत आणि  संभाव्यसाठी जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ठ तयारी केली आहे. पंढरपूर, करमाळा आणि माळशिरस तालुक्यातील ऑक्सिजन प्लान्ट नागरिकांच्या सेवेसाठी तयार झाले आहेत. यामुळे मुबलक ऑक्सिजन मिळू शकणार आहे. तरीही प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या.

संचारबंदीच्या तालुक्यात दुकानांना सहा वाजेपर्यंत परवानगी
संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन सज्ज आहे. बेडची क्षमता वाढविण्यात आली असून औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. रूग्णसंख्या कमी होण्यास पाच तालुक्यात संचारबंदी लागू केल्याचा फायदा झाला. या तालुक्यात आता सहा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.
(Advertise)

गणपती काळात काळजी घ्या
नागरिकांनी गणपती उत्सवामध्ये गर्दी करू नये. शांततेत घरीच विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण केली असून नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सध्या 1910 रूग्ण ग्रामीण भागात तर 19 सोलापूर शहरात असे 1929 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. आयसोलेशन बेड 23 हजार 658 तर ऑक्सिजन 4819 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. माझे मूल माझी जबाबदारी अंतर्गत सहा लाख 7 हजार 393 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी 665 मुले कोविड सदृश्य लक्षणे असलेली तर 73 मुले कोविडबाधित असल्याचे आढळले. सर्वांवर उपचार केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.

ऑक्सिजनचे सात प्रकल्प सुरू झाले असून पंढरपूर, करमाळा आणि माळशिरस येथील प्रकल्प नव्याने सुरू झाले आहेत. 10 साठवण टँकही कार्यान्वित झाले आहेत. म्युकर मायकोसिसचे केवळ 21 रूग्ण सध्या उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली. 

अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नऊ रूग्णवाहिकांचे लोकार्पण
दरम्यान, पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते आज नियोजन भवन येथे राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या नऊ रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जेऊर ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ (ता. अक्कलकोट), प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगाव (ता. बार्शी), प्राथमिक आरोग्य केंद्र, साडे आणि वरकुटे (ता. करमाळा), प्राथमिक आरोग्य केंद्र, मोडनिंब आणि रोपळे (ता. माढा), प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबरे पागे (ता. पंढरपूर) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, होटगी (दक्षिण सोलापूर) याठिकाणी रूग्णवाहिका देण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments