सोलापूर/प्रतिनिधी:
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथून सोलापूरकडे येत असलेल्या पेट्रोल पंप चालक डॉक्टरचे अपहरण करून ५ लाख ८८ हजार ४२० रूपये जबरदस्तीने काढून घेवून पुण्यात डॉक्टरला सोडून देणाऱ्या ७ सराईत गुन्हेगारांना ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह अटक करून गुन्हा उघड केल्याची माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय ४७, उत्तर कसबा सोलापूर) हे त्यांचे उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे पेट्रोल पंप असून २१ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोल पंपावरील दिवसभराचे पैसे जवळपास ५ लाख ७० हजार ४२०रूपये घेवून सोलापूरकडे त्यांच्या वेरणा या कारमधून येत असताना बीबीदारफळ ते कोंडी या दरम्यान त्यांचे अपहरण करून त्यांना १ कोटीची खंडणी मागण्यात आली आणि शस्त्राचा धाक दाखवून हॉकी स्टीकने मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून मोहोळ, पंढरपूर, टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड मार्गे पुण्यातील वारजे माळवाडी येथे नेवून त्यांच्या जवळील ५ लाख ८८ हजार ४२० रूपये रोकड काढून घेवून त्यांना गाडीतून ढकलून सोडण्यात आले, अशी फिर्याद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात डॉक्टर अनिल कुलकर्णी यांनी दिली,त्यावरून पोलीसांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना याबाबतचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी त्यांच्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांना गुन्ह्याचा तपास करण्यास सांगितले. त्यावरून घटना घडली त्या दिवसापासून परिसरातील सर्व बाबी तपासल्यानंतर आरोपी हे पुण्याचे असल्याचे समजले.
पोलीस पथक पुण्याला जावून दोन दिवस मुक्काम करून गुन्हेगारांना जेरबंद केले. या गुन्ह्यात विकास सुभाष बनसोडे (वय ३१, रा. सिंहगड रोड, पानमळा वसाहत पुणे),रोहित ऊर्फ सोन्या राजू वैराळ (वय २८, रा. वडगांव ब्रु. भवानी नगर पुणे),रामचंद्र बालाजी कांबळे (वय २८, रा. साईधाम हवेली पुणे), भारत दत्तात्रय गायकवाड (वय ३१), मुराद हनिफ शेख (वय ३१, दोघे रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर,जि. सोलापूर), वैभव प्रविण कांबळे (वय २१, रा.जवळा, ता. कळंब, जि. धाराशिव), सिध्दार्थ उत्तम सोनवणे (वय ४२, रा. पानमळा वसाहत सिंहगड रोड, पुणे) असे आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले.
या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेला विकास बनसोडे याने त्याच्या मामाचे गाव वडाळा येथे आहे. त्याने त्याच्या मामाच्या मुलाकडे विचारणा केली की आपल्याला काही तरी करून पैसे कमवायचे आहे. त्यावर मामाचा मुलगा आरोपी भारत गायकवाड याने सांगितले, गावातील एक पेट्रोलपंपाचा मालक रोज मोठी रक्कम घेवून जातो. त्याला अडवून पैसे मिळवता येतील. यावर विचार करून विकास बनसोडे याने त्याच्या इतर साथीदारांना घेवून एक इनोवा फिरायला घेवून जातो म्हणून मित्राकडून आणली एम एच ४२, एन ४५५४ ही इनोवा घेवून सर्व आरोपी हे सोलापूर शहरात आले.
त्यांनी जुना पुना नाका परिसरातील अॅम्बेसिडर हॉटेल लॉज येथे मुक्काम केला आणि २१ सप्टेंबर रोजी आले. त्या सर्व गुन्हेगारांनी मिळून वडाळा येथे मामाचा मुलगा असलेला भारत याच्या सांगण्यावरून वडाळा येथून वेरना कारमध्ये घराकडे निघालेल्या पेट्रोलपंप चालक डॉक्टर अनिल कुलकर्णी यांचा पाठलाग करीत बीबी दारफळ ते कोंडी रस्त्यावर आल्यावर डॉक्टरच्या कार समोर इनोवा आणून अडवले आणि डॉक्टरला जबरदस्तीने इनोवा मध्ये बसवून पुण्याकडे नेले. दरम्यान आरोपी भारत याने वडाळ्यात झोपलेल्या एकाचा मोबाईल चोरला होता आणि त्यातील सीमकार्ड या गुन्ह्यात वापरला होता. या गुन्ह्यातील आरोपी विकास बनसोडे याच्या विरूध्द पुण्यातील हवेली पोलीस ठाण्यात दरोड्याचे जबरी चोरीचे गुन्हे आहेत. रोहित वैराळ आणि रामचंद्र कांबळे या आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल आहे.
अपहरणाचा गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तातडीने घटनास्थळावरील मोबाईल टॉवरचे डिटेल्स काढून तपासले त्यावेळी चोरीतील मोबाईलबाबतही माहिती मिळाली. त्यावरून पोलीसांनी तपास करीत गुन्ह्याची उकल केली आणि गुन्ह्यातील मुद्देमाल एक इनोवा, मोबाईल, आणि रोकड असा ८ लाख १३ हजार हस्तगत केले. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पेालीस अधिक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे,हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मन्सावाले,अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी ही कामगिरी पार पाडली.
0 Comments