करमाळा/प्रतिनिधी:
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले मनोहर मामा यांच्यावर एकापाठोपाठ एक फसवणुकीचे आरोप होत असतानाच आता एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाचा तर बारामतीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपासून त्यांनी अनेक भक्तांना आर्थिक गंडा घातल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात त्यांनी पुण्यात आपल्या वकिलासह पत्रकार परिषद घेत या आरोपांचे खंडन केले होते.
स्वतःला बाळूमामांचे भक्त म्हणवणाऱ्या मनोहर मामांकडे शेजारच्या जिल्ह्यातील एक महिला भक्त घरगुती अडचणींमुळे सल्ला घेण्यासाठी काही महिन्यापूर्वी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मठात आली होती. यावेळी आपला लैंगिक छळ झाल्याची तक्रार आता या महिलेने दिली असून आर्थिक फसवणूक झाल्याचेही तिने करमाळा पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान बारामती येथील शशिकांत खरात यांच्या वडिलांना थायरॉईडचा कॅन्सर होता, तो बरा करण्यासाठी मनोहर मामा यांनी खरात यांचेकडून 2 लाख 51 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बारामती पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार मनोहर भोसले यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा ऊर्फ मनोहर भोसलेविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल झाल्यामुळे पाय चांगलाच खोलात गेला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून मनोहर मामा फरार झाला होता. पण, अखेर सोलापूर आणि बारामती पोलिसांनी त्याला साताऱ्यातून ताब्यात घेतलं आहे.
0 Comments