विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना पंजाबमध्ये मोठय़ा राजकीय घडामोडी घडल्या असून काँग्रेस पक्षाने राज्यातील ‘कॅप्टन’ बदलला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शनिवारी राजीनामा दिला. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनील जाखड आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव आघाडीवर आहे.
तब्बल साडेनऊ वर्षे अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असा संघर्ष पाहायला मिळाला. काँग्रेसने सिद्धू यांची दोन महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर अमरिंदर सिंग यांची नाराजी वाढली. शनिवारी सकाळी राजकीय हालचालींना वेग आला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठाRनी राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा होती. अखेर सायंकाळी ४.३५ वाजता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आता हव्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी सूचक विधान केले. ‘मी ५२ वर्षे राजकारणात आहे. त्यातील साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री राहिलो आहे. भावी वाटचालीसाठी माझ्याकडे नेहमीच पर्याय असणार आहे. मी आधी सहकाऱयांशी बोलेन आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेईन’, असे अमरिंदर सिंग म्हणाले.
पंजाब विधानसभेचे संख्याबळ ११७ असून, त्यात काँग्रेसचे ८० आमदार आहेत. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे देणार याची उत्सुकता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे चर्चेत आहेत. जाखड हे माजी प्रदेशाध्यक्ष, तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिले आहेत.
अमरिंदर सिंग यांनी राजीनामा देण्यापूर्वीच जाखड यांचे एक ट्विट चर्चेत आले. ‘राहुल गांधी यांनी समाधानकारक मार्ग काढला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते खूश आहेत’, असे जाखड यांनी ट्विट केले होते.
राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, मी सकाळी काँग्रेस पक्षश्रेष्ठाशी बोललो आणि आज पदाचा राजीनामा देत आल्याचे कळविले. गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा आमदारांना दिल्लीत बोलावून पक्षश्रेष्ठाRनी मीटिंग घेतली. मला वाटते पक्षश्रेष्ठाना माझ्यावर संशय आहे. मला अपमानित झाल्यासारखे वाटते, त्यामुळे मी राजीनामा दिला.
0 Comments