✒️रवी देवकर, सोलापूर
एपीजे अब्दुल कलाम यांनी शिक्षकांना शिडीची उपमा दिली आहे.शिडी एकाच जागी उभी असते आणि अनेकजण तिचा उपयोग करतात.प्रत्येकजण त्या शिडीचा उपयोग करीत उंच भरारी घेत असतो.त्यातून अनेकांच्या जीवनात प्रकाशवाटा निर्माण करीत असतो.त्यातून बरेचजण शिखरावर चढाई करतात,मात्र शिडी जागच्या जागी उभी असते.शिक्षकांचे तसेच आहे.त्याच्या हातून निर्माण होणारे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात जातात,अधिकारी बनतात,अनेक क्षेत्रात भरारी घेतात.येथे प्रत्येक शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांच्या यशाचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो.कृष्णपरमेश्वर सुतार हे अशा शिक्षकांपैकीच एक आहेत.
कृष्णपरमेश्वर सिद्धप्पा सुतार यांचे शिक्षण एम.ए.डी.एड.अॅग्री डिप्लोमा असे झाले असून ते मुळचे राहणारे मुक्काम हिळळी,पोस्ट शावळ,तालुका अक्कलकोट येथील रहिवासी असून सध्या ते नोकरीच्या निमित्ताने राजस्व नगर विजापूर रोड,सोलापूर येथे राहतात.मागील १० वर्षांपासून ते निरंतरपणे अध्यापनाचे काम करत आहेत.त्यांची मूळनियुक्ती मनपा मराठी मुलींची शाळा क्र.16 बाळीवेस,सोलापूर येथे दीड वर्षे अध्यापनाची सेवा बजावल्यानंतर ते मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्र.२८ सुंदरम नगर,विजापूर रोड येथे पाच वर्षे सेवा बजावली.इयत्ता १ ली ते ५ वी वर्गांची सेमी इंग्रजी शाळा येथे केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी ते सांभाळत शाळेचे कामकाज व तसेच वर्ग अध्यापनासोबत ते विविध सहशालेय उपक्रम राबवीत आहेत.
(Advertise)
कृष्णपरमेश्वर सुतार हे सुरुवातीला मनपा १६ नंबर शाळेत रुजू झाल्यावर वर्गात त्यांना मोजकीच मुले दिसली आणि सुतार सरांना रुजू करून घेतलेले मुख्याध्यापकांची त्याच दिवशी बदली झाल्याने त्यांनी सुतार सरांकडे शाळेची जबाबदारी सोपवली.अश्या अवस्थेत ते न डगमगता सम्राट चौकाच्या पाठीमागे असलेल्या वस्तीतील मुलांना स्वतःच्या दुचाकीवर बसवून शाळेत आणत आणि अध्यापनाचे कार्य करीत. .तद्नंतर त्यांची बदली मनपा शाळा क्र.२८ सुंदरम नगर येथे झाली.परंतू तिथेसुद्धा हीच परिस्थिती.शाळेत मुलांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आणि त्यात महानगरपालिकेच्या शाळांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्याने पालकांचा महानगरपालिकेच्या शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी नकारघंटा असायचा.अशा स्थितीत वीटभट्टीवरील कामगारांची मुले स्वतःच्या दुचाकीवरुन शाळेत आणून शाळा सुरु केले.
(Advertise)
ही स्थिती बदलण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते.त्याचवेळी तत्कालिन प्रशासनाधिकारी विष्णु कांबळे यांनी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सरांना विशेष प्रयत्न करायला सांगितले.म्हणून नजर लागू नये म्हणून लिंबू,मिरची,कोहळा विकणारे पारधी वस्तीतील मुलांवर त्यांची नजर गेली.सदर वस्तीतील मुले कोणत्याच शाळेत जात नव्हती किंवा कोणत्याच शाळा त्यांच्यापर्यंत गेले नव्हते.वस्तीतील सर्व नागरिकांना एकत्र करून त्यांचे समुपदेशन करुन मोफत शिक्षण व सर्व सुविधा देण्याच्या अटीवर शाळेत त्या मुलांना दाखल करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
याचवेळी सुतार सरांचे सहकारी मित्र गौरीशंकर नारायणे सर यांची शाळेत नियुक्ती झाली आणि या शाळेला आणखीन एक चांगला शिक्षक मिळाला.तेथून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना साक्षर,सक्षम नागरिक बनवण्याचा नवा प्रवास सुरु झाला.या मुलांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती व समाजसेवी संस्थाकडून मदत घेत शाळा वाढविण्याचे व डिझिटल करण्याचे स्वप्न पहिले.त्यासाठी शाळा बालस्नेही करणे गरजेचे होते म्हणून सुरुवातीला शाळा रंगवण्याचे ठरवून स्वतः दोघांनी हाती कुंचले घेऊन रंगवून काढले.मुलांना आवडेल अशा शालेय वातावरणाची निर्मिती केली.दानशूर,शिक्षणप्रेमी,मित्र परिवार यांच्याकडून मदत निधी घेत २५ जानेवारी २०१५ ला पहिले डिझीटल वर्गाचे उद्घाटन केले.हा प्रवास येथेच न थांबवता टॅब स्कूल करण्याचे ठरविले आणि सोशल मिडियाचा आधार घेत लोकसहभागातून एक-एक टॅब जमवत एकूण १७ टॅब जमा केले.प्रिसिजन कंपनीकडून एक क्लासरूम डिझिटल झाले.तीन वर्ग सर्व अत्याधुनिक सुविधेसह डिझिटल क्लासरूम बनविले आहे.सुरुवातीला अत्यंत कमी पटसंख्या असलेल्या शाळेची सद्यस्थितीतील पट शंभरी गाठला आहे.या सगळ्या गोष्टींचे श्रेय सुतार सर शाळेतील इतर सहकार्यांना देतात.
(Advertise)
सद्या या शाळेत कमलानगर,सुशीलनगर,बहुरूपी नगर येथील विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.सर्व सहकार्यांना शाळेविषयी तळमळ असल्यामुळे हा प्रवास करू शकल्याचे ते सांगतात.यात सहकारी मित्र गौरीशंकर नारायणे सरांचा तितकाच वाटा आहे.याशिवाय सामाजिक कार्यात सरांचा सक्रीय सहभाग असल्याने आपल्या ओळखीचा उपयोग त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी केलेला दिसून येतो.
जनकल्याण समिती अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर घेणे,समाजसहभागातून गरिबांना कपडे वाटप करणे,वृक्षारोपण कार्यक्रम,सार्वजनिक स्वच्छता कार्यक्रमात सहभाग नोंदवणे,पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणे,गड,किल्ले ट्रॅक करणे,निसर्गाच्या सानिध्यात राहणे असे विविध छंद देखील त्यांनी जोपासले आहेत.हे कार्य करताना शिक्षण मंडळातील सर्व सहकार्यांकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांची पत्नी रुपाली यांचे पाठबळ मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात.
कोरोना प्रार्दुभाव काळात जनजीवन विस्कळीत झाले.अशा स्थितीत शिक्षण व्यवस्था देखील ठप्प होईल काय अशी अवस्था असताना मानवजातीला दिशा
देणारा शिक्षकरुपी दीपस्तंभ या नात्याने संकटकाळाच्या स्थितीत आरोग्य व्यवस्थेला मदत करण्याचे कार्य केलेले आहे. या महामारी संकटात देखील ज्ञानदानाचा वसा कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.या प्रवासात सुतार सरांना प्रशासनाधिकारी कादर शेख यांचे मार्गदर्शन लाभले.कोविड -19 ची सेवा बजावत शाळेचे कामकाज पाहणारे शाळेतील शिक्षक बांधव यांच्या प्रयत्नामुळे शाळेच्या शिक्षण प्रवासात खंड पडला नसल्याचे सुतार सर आवर्जून सांगतात.
आजारांबद्दल जनजागृती केल्यास राष्ट्रावरील आपत्ती टाळण्यास मदत होईल.म्हणून प्रशासनाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्यावतीने गुरुमंत्र उपक्रम राबविला.यामध्ये शाळेतील सर्व मुलांना दररोज फोनद्वारे संपर्क साधून कोरोना महामारीपासून आपले आरोग्य,कुटुंबातील सदस्यांची आरोग्याची काळजी घेणे,आपल्याबरोबर आपल्या परिसरातील लोकांना उद्बोधन करणे,शासनास सहकार्य करणे,विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणे,यामुळे गुरु-शिष्य नाते अधिक मजबूत होईल हा दृष्टीकोन ठेवला होता.शाळेतील सर्व शिक्षकांनी रोज १० विद्यार्थ्यांना फोनद्वारे त्यांचा अभ्यास,आरोग्याबाबत विचारपूस करण्यात आले.यामुळे मुलांचे व पालकांचे शिक्षकांविषयी आदरभावनाते दृढ झाले.
आपल्या शाळेतील मुले ही कामगार पालकांची मुले आहेत.बहुतांश पालकांकडे स्मार्ट मोबाइल अथवा ऑनलाईन शिक्षण घेण्याचे साधन नसल्याकारणाने शिक्षण प्रक्रिया चालू ठेवण्यात अनेक अडचणी आल्या.यावर उपाय म्हणून शेजारी राहणाऱ्या शिक्षक मित्रांचे सहकार्य घेउन प्रत्येक वर्गाचे whatsapp ग्रुप तयार तयार केले.या ग्रुपमध्ये तंत्रस्नेही शिक्षक मित्रांनी तयार केलेला अभ्यास,pdf,इमेज,अभ्यासाचे youtube लिंक,दीक्षा ॲप, लिंक,व्हिडीओ इत्यादी गोष्टी ग्रुपवर शेअर करून मुलांचे
अभ्यास चालू ठेवण्याचे कार्य केले.
प्रारंभी जितक्या मुलांकडे स्मार्टफोन आहेत त्यांचे ऑनलाईन क्लास घेण्याचे प्रयत्न केले.शिवाय ज्या मुलांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्याचे साधन नाही,अशा मुलांना शाळेत उपलब्ध असलेले टॅब देऊन ऑनलाईन शिक्षण घेण्यार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केली.टॅब स्कूल निर्मितीची संकल्पना या काळातही उपयोगी पडले.हे Android असल्याने नेट कनेक्ट करून अभ्यासाचे,pdf,विविध विषयांचे ॲपद्वारे मुलांचे शिक्षण चालू ठेवले.
“ *शाळा बंद,शिक्षण चालू" या उपक्रमांतर्गत मुलांचे शिक्षण चालू ठेवणे गरजेचे असल्याकारणाने ऑनलाईन शिक्षणात सर्व मुले समाविष्ठ होत नव्हते.म्हणून प्रत्यक्ष गृहभेट देऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले.शाळेतील इतर सर्व शिक्षक कोविड ड्युटीवर असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणे शक्य नव्हते.म्हणून गटाने शिक्षण चालू ठेवले.मुलांना भरपूर वेळ मिळावे या उद्देश्याने भिंतीवरची शाळा* हे उपक्रम त्याना सुचले व ते सक्षमपणे राबवले.राहुल कदम या शाळेतील पालकाच्या घरासमोरील मोकळ्या जागेत शारीरिक अंतर राखून भिंतीच्या सावलीत शाळा भरवली.हा उपक्रम देखील यशस्वी झाला.सध्या कमला नगर समाज मंदिर येथे चालू वर्षी शाळा भरवित आहेत.
मागील वर्षी ITS स्पर्धेत विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते.त्यापैकी सुरज चौधरी या विद्यार्थ्यांने केंद्रात अव्वल येऊन शाळेचे नावलौकिक वाढवले व इतर ३ विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे यश संपादन केले आहे.
अत्यंत प्रामाणिकपणे अध्यापनासोबत सहशालेय उपक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याने त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून विविध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करुन त्यांना त्यांच्या कार्याची पावतीच देण्यात आली आहे. त्यांना २०१६ साली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार,लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार,सकाळ वृत्तपत्र समूहाचा गौरव,२०१७ साली मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ,सोलापूरकडून उपक्रमशील शिक्षक पुरस्कार,२०१८ साली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी व अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेचा गुणवंत पुरस्कार,२०१९ साली सारथी फॉउंडेशन,सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार,कन्या फौंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शासकीय परिपत्रक शाळेपर्यंत आणि शाळेतील माहिती बिनचूक व त्वरित शासन दरबारी पोहचवण्याचे कार्य अहोरात्र करणारे मनपा केंद्र क्रमांक २८ चे केंद्रप्रमुख ,शांत वृत्तीचे पण वक्तशीर असलेले कृष्णपरमेश्वर सुतार सर हे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावून शुन्यातून विश्व निर्माण करुन अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविले आहे.त्यांच्या कार्याला माझा सलाम...त्यांच्या पुढील शैक्षणिक,सामाजिक शुभ कार्यासाठी माझ्याकडून आभाळभर हार्दिक शुभेच्छा..!
0 Comments