तालुक्यातील एकही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही : आमदार राजाभाऊ राऊत


बार्शी तालुक्यात मागील ४-५ दिवसांत सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजे १२६ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे शेतीचे व खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तालुक्यातील या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार राजाभाऊ राऊत, प्रांत अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांच्या सोबत मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची तहसील कार्यालय येथे संयुक्त आढावा बैठक झाली.

(Advertise)

सदर बैठकीमध्ये तालुक्यातील मंडल निहाय पावसाची माहिती घेऊन, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे व पिकांचे पंचनामे करण्याचा निर्णय झाला. 

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या प्रयत्नातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरूच राहणार आहेत. तालुक्यातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेण्याचे या बैठकीत ठरले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता, काळजी न करता धीर सोडू नये असे आवाहन आमदार राजाभाऊ राऊत व प्रांत अधिकारी हेमंत निकम साहेब यांनी केले.

Post a Comment

0 Comments