अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मोठा करीष्मा केला. राम शिंदे यांना चारीमुंड्या चीत केले. मात्र त्यानंतर रोहित पवार यांच्या नेतृत्वात कर्जत जामखेडमध्ये अनेक निष्ठावंतांनी हाती घड्याळ बांधले. भाजपाचे अनेक पदाधिकारी रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना भाजपात अस्वस्थता आहे.
कर्जत नगरपंचायत उपनगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांनी भाजपाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. नामदेव राऊत यांच्या रूपाने रोहित पवार यांनी भाजपाच्या गडालाचा सुरूंग लावल्याचे चित्र आहे. तर नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर नामदेव राऊत यांनी भाजपाची साथ सोडल्याने हा माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपा नेते आणि कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. राऊत यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे पाठवला आहे.
राऊत यांनी आपली भुमिका मांडतांना सांगितले की, राजीनाम्याचा निर्णय एकट्याचा आहे. मात्र काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. तर राजीनाम्याबद्दल थोड्याच दिवसात सार्वजनिकरित्या बोलणार आहे. तसेच माझ्या राजीनाम्याला महासंग्राम युवा मंचचेही समर्थन आहे, असे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, मी राजकीय जीवनात काम करत असताना स्व. दिलीप गांधी, प्रा. राम शिंदे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, अभय आगरकर, प्रा. भानुदास बेरड या सर्वांचे सहकार्य लाभले. तर भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याविषयी नाराजी नाही. मात्र जनतेची कामे करण्यासाठी राजकीय पक्षाची गरज असते. त्यामुळे रोहित पवार यांच्या नेतृत्वात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, असे राऊत यांनी सांगितले. तर रोहित पवार यांनी मला कोणताही शब्द दिलेला नाही आणि मी अपेक्षाही ठेवली नाही, असे राऊत म्हणाले.
राऊत यांनी सांगितले की, कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा एकही सदस्य नसतांना रोहित पवार यांनी नगरपंचायतीला निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे रोहित पवार यांची काम करण्याची पध्दती आवडली. तर राऊत यांनी शिवसेनेपासून आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. तर भाजपात त्यांचा प्रवास चांगलाच स्थिरावला होता. याबरोबरच नामदेव राऊत यांना विधानसभेचे उमेदवार म्हणूनही पाहिले जात होते. मात्र आता रोहित पवार यांनी नामदेव देवा राऊत यांना आपल्याकडे खेचत भाजपाला जोरदार धक्का दिला आहे
0 Comments