बार्शी/प्रतिनिधी:
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुक्यामध्ये ४ सप्टेंबर २०२१ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतातील शेती उपकरणे, अवजारे पाण्यात वाहून गेली आहेत. त्याचबरोबर फळबागांची व सोयाबीन, तूर, उडीद, मूग इत्यादी पिकांची तसेच कांदा, टोमॅटो, मिरची इत्यादी भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरांची पडझडही झालेली आहे.
बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे व संसार उपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान होऊन, अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनेक दुकानांमध्ये पाऊसाचे पाणी जाऊन दुकानातील सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
बार्शी शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून, त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार , पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून व तहसीलदार सुनील शेरखाने यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
0 Comments