राष्ट्रवादीमध्ये एकच गट, तो म्हणजे पवार साहेबांचा



एखाद्या पदावर काम करत असताना आपण कोणत्या एका गटाचे, भागाचे, पक्षाचे म्हणून न राहता सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी. समाजातल्या सर्व घटकांना मदत करता आली पाहिजे. निवडणुकीत भलेही तुम्ही राजकारण करा; परंतु निवडणुकीनंतर सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कोणतेही गट, तट नाही. जो गट आहे तो फक्त पवार साहेबांचा गट आहे. त्यामुळे राजकारणात गट तट नसावे, असा सल्ला शिरूरच्या नेत्यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाबळ येथील उपबजार केंद्राचे उद्‌घाटन मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शिरूर तालुक्‍याचा भाग हा विधानसभेच्या दोन मतदार संघात विभागला गेल्यामुळे या तालुक्‍यात नेहमीच विभागीय राजकारण पाहायला मिळते. यावेळी माजी सभापती प्रकाश पवार यांनी चासकमानच्या पाणी वितरणावर ‘टेल टू हेड’ असं राजकारण न करता ‘हेड टू टेल’ असं वितरण व्हावं, पश्चिम भागालाही पाणी मिळावं अशी भूमिका बोलताना व्यक्त केली तर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिलीप वळसे पाटील यांचा राजकारणात आदर्श घेण्याचा सल्ला आमदार अशोक पवार यांना दिला. दरम्यान पाबळसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी, त्याचबरोबर थिटेवाडी प्रकल्पाला पाणी मिळावे याचीदेखील मागणी जि. प. सदस्या सविता बागाटे यांनी केली.

आमदार अशोक पवार म्हणाले, खालचा आणि वरचा भाग असा तालुक्‍यात कधीही भेदभाव न करता सर्वांगीण तालुक्‍याचा विकास हीच भूमिका घेतली जाते. थिटेवाडी पाणी प्रश्न वळसे पाटीलच सोडवू शकतात, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले. पाण्यापासून वंचित असलेल्या भागाचा पाणी प्रश्न कसा सोडवता येईल, याबाबत एक बैठक घेऊन तो प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर शेजारीच असलेल्या आंबेगाव बाजार समितीच्या लोणी येथील उपकेंद्राची आणि पाबळच्या उपकेंद्राची शर्यत करू नका असाही सल्ला संचालक मंडळाला सल्ला दिला.

Post a Comment

0 Comments