सुप्रसिद्ध लोक कलावंत सुरेखा पुणेकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सुरेखा पुणेकर यांनी आक्रमक भूमिका मांडलीय. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु नका. मात्र महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी विचारला आहे. प्रवीण दरेकरांनी माफी मागावी, त्याशिवाय महिला शांत बसणार नाहीत, असा इशाराही सुरेखा पुणेकर यांनी दिला आहे.
आपण दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात आले. चित्रपटातील लोक राजकारणात जातात. लावणीतील लोक जाऊ शकत नाहीत का? असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला आहे. पक्षप्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचंही सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं.
प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.
दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.
0 Comments