बुलढाणा/प्रतिनिधी:
भरधाव ट्रकने चिरडल्याने मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिला पोलिसाचा मृत्यु झाला. आज पहाटे चिखलीरोडवर ही दुर्घटना घडली. गीता बामंदे (वय ४५) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिला पोलिस कर्मचायाचे नाव आहे . त्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या.
या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे तातडीने घटना स्थळी दाखल झाले. या घटनेमुळे बुलढाणा जिल्हा पोलिस दलांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिमाचल प्रदेश येथून सफरचंद भरलेला ट्रक नांदेडकडे जात असताना हा अपघात घडला. चिखली रोडवरील विद्युत वितरण कार्यालयाच्या समोर ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला प्राण गमवावे लागले. ४५ वर्षीय गीता सुभाष बामंदे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी हिमाचल प्रदेशहून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या सफरचंदाने भरलेल्या ट्रकची त्यांना जबर धडक बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती पोलीस विभागाला मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रक क्रमांक पीबी ०३ बीबी ८१३९ आणि ट्रक चालक बाबुसिंग प्रेमसिंग अहिरे (राहणार पंजाब) याच्यासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्याचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने शहर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे.
0 Comments