शाळा सुरु करण्याचा विचार, शिक्षकांच्या लसीकरणावर भर, राजेश टोपेंची माहिती


 कोरोना रुग्ण नसलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सचा विचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, येत्या ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'स्पेशल ड्राइव्ह' घेणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्य सरकार शिक्षकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे सांगून टोपे म्हणाले की, 'कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी आधी शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती पावले टाकत आहे.'

टोपे म्हणाले, की केरळमध्ये ओणम उत्सवानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागणार आहे. केंद्राने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करणार आहे.

 दरम्यान, शाळा सुरु करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

 एकीकडे शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करीत असले, तरी राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. शनिवारी (ता. २८) राज्यात ४८३१ रुग्ण आढळले. तसेच १२६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

Post a Comment

0 Comments