सोलापूर शहर करोनामुक्तीच्या वाटेवर; जिल्ह्यातही सुधारणा



 गेली दीड वर्षे करोनाचे भयसंकट झेलणारे सोलापूर शहर आता अखेर करोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जेमतेम ६० रुग्ण उपचाराधीन आहेत. तर मृतांच्या संख्येतही मोठी घट होत आहे.

दरम्यान, शहराच्या तुलनेत जिल्हा ग्रामीणमध्ये करोना प्रादुर्भाव अजूनही काही प्रमाणात जाणवत असला तरी त्यातही आता आश्वासक चित्र निर्माण होत आहे. दुसरम्य़ा लाटेत दररोज सरासरी ३५ रुग्णांचे बळी जात होते. मात्र आता दररोज सरासरी केवळ ५ मृतांचा आकडा आहे. शहरात सध्या केवळ ६० रूग्णांवर (०.२१ टक्के) उपचार सुरू असताना जिल्हा ग्रामीणमध्येही तुलनेत कमी म्हणजे १९८० (१.४८ टक्के) एवढेच रुग्ण उपचाराधीन राहिले आहेत.

शहरात गुरुवारी ७५२ करोना अहवाल हाती लागले असता त्यात नवे फक्त १० रुग्ण आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकू ण २८ हजार ५०७ रुग्णांपैकी २७ हजार ०४३ (९४.८६ टक्के) करोनामुक्त झाले आहेत. तर एकूण मृतांची संख्या १४०४ (४.९२ टक्के) आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये करोनामुक्त होण्याचे एकूण प्रमाण ९६.२८ टक्के आहे. एकूण एक लाख ३३ हजार ०८ बाधितांपैकी एक लाख २८ हजार ७१ जण करोनामुक्त ठरले आहेत. मृतांची संख्या आतापर्यंत २९५८ वर (२.२२ टक्के) पोहोचली आहे. गुरुवारी एकूण प्राप्त झालेल्या ८४४५ अहवालांपैकी २९० रुग्णांचे अहवाल बाधित निघाले.

Post a Comment

0 Comments