संसाधनांच्या कमतरतेचा विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला (online education) फटका बसू नये यासाठी नवी मुंबई महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाइल इंटरनेट कनेक्शन विकत घेता यावं यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी लॉकडाउन लागल्यापासून पालिकेच्या शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षण दिलं जात आहे. मात्र पालिकेतील अनेक विद्यार्थी निम्न-मध्यम वर्गातील कुटुंबातून असून त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी पैसे नाहीत.
पालिकेच्या शाळांमध्ये एकूण ४० हजार विद्यार्थी शिकत आहेत. अनेक कुटुंबांकडे संगणक नसून साधा स्मार्टफोन असल्याचं समोर आलं आहे. अनेक पालकांना मोबाइल इंटरनेट घेणं परवडत नसल्याने विद्यार्थी ऑनलाइन क्लाससाठी हजेरी लावू शकत नव्हते ज्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नवं शैक्षणिक वर्ष सुरु होत असून आणि शाळा सुरु होण्याची शक्यता फारच धूसर असल्याने विद्यार्थ्यांकडे इंटरनेट कनेक्शन असणं खूप गरजेचं झालं आहे असंही अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
“ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून शाळा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही ऑनलाइन शिक्षण (online education) सहजपणे उपलब्ध व्हावं यासाठी योजना आखत आहोत. मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी आणि पालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असून इंटरनेट रिचार्ज त्यापैकी एक असल्याचं समोर आलं आहे,” अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
ऑनलाइन शिक्षणासाठी आम्ही अनेक योजना आखात असून इंटरनेट डेटा प्लानची मुलभूत समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना ५०० रुपेय देणार आहोत जेणेकरुन किमान तीन महिने त्यांना इंटरनेट मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे. या पैशांचं वाटप कसं करायचं यासंबंधी पालिका प्रस्तावावर काम करत असून पालकांचा खात्यात हे पैसा जमा करण्याचा विचार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
0 Comments