जळगाव:
नात्याने सावत्र बाप असलेल्या एका नराधमाने त्याच्या मुलीवरच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेसंदर्भात पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे.
या घटनेतील पीडित तरुणी ही बीसीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. तिच्या आईचा जळगावातील व्यक्तीशी २०१४ मध्ये दुसरा विवाह झालेला होता. विवाहानंतर पीडित तरुणी तिची आई व लहान बहिणीसोबत जळगावात सावत्र बापाकडे राहत होती. २३ जानेवारी रोजी आईच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी घरातील सर्व जण झोपलेले असताना रात्री २ वाजता सावत्र बापाने पीडितेला झोपेतून उठवून तिच्यावर अत्याचार केले.
या प्रकारानंतर पीडितेला तिच्या आईने पुण्याला माहेरी पाठवून दिले होते. त्यानंतरही पीडितेच्या मोबाईलवर तिचा सावत्र बाप अश्लिल संदेश पाठवत होता. हा प्रकार असह्य झाल्याने पिंपरी चिंचवड पोलिसात सावत्र बापाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर संशयित आरोपी बापाला अटक झाली आहे.
यापूर्वी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पीडितेच्या वाढदिवशीच सावत्र बापाने तिच्यावर अत्याचार केला होता. हा प्रकार कुणाला सांगितला तर आईला व बहिणीला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली होती. दरम्यान, या गुन्ह्यात पीडितेच्या आजीला (सावत्र बापाची आई) देखील सहआरोपी केले आहे.
0 Comments