तीन वर्षीय मुलाला चटके; भोंदूबाबाचे बालकावर अघोरी उपचार ; प्रकृती चिंताजनक...

 
 अमरावती : मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर असतानाच मेळघाटातील अशिक्षित आदिवासींचे अंधश्रद्धेला बळी पडण्याचे प्रकार सुरूच आहेत. 
नुकतेच मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात एका तीन वर्षीय आजारी बालकाच्या पोटाला तप्त सळईचे चटके देण्याचा अघोरी प्रकार उघड झाला आहे. 
या बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

ज्यांनी आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार केला त्या संत गाडगेबाबा यांच्या अमरावती जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा कायम आहे. या तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर विळ्याने ७० पेक्षा जास्त चटके देण्यात आले आहेत.  अनेक आदिवासी डॉक्टरांकडे न जाता भोंदूबाबांकडे जाऊन उपचार घेतात.  या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आली नाही.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेऊन लवकरच संबंधितावर कारवाई केली जाईल, असे चिखलदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी सांगितले. 


गेल्या वर्षी जूनमध्ये मेळघाटातील बोरदा या गावात श्याम सज्जू तोटा या आठ महिन्यांच्या बालकाला पोटाच्या आजारासाठी पोटाला गरम सळईचे चटके देण्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर लगेच बारुगव्हाण गावात निकिता दिलीप चिमोटे या दोन वर्षीय बालिकेलाही चटके देण्याचे प्रकरण उघडकीस आले. 

मेळघाटातील अंधश्रद्धा कुपोषणाच्या वाढीसही कारणीभूत मानली जाते. गेल्या वर्षी एकाच महिन्यात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या होत्या. पावसाळ्यात लहान बालकांचे पोट दुखायला लागले की गावातील मांत्रिक म्हणजेच भगत किंवा घरातील मोठी व्यक्ती पोटावर गरम विळ्याने किंवा सळईने चटके देतात.

Post a Comment

0 Comments