पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात विविध कारणांमुळे अनेक मंत्रिपदं रिक्त झाली आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन त्याचबरोबर शिवसेना व अकाली दल हे मित्र पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्री पदं रिक्त आहेत आणि कोरोनाकाळात सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली असताना सरकारची प्रतिमा काही प्रमाणात सकारात्मक करण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची गरज असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर देण्यात आला त्यानंतर आता महाराष्ट्राचे भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळात नेमके काय फेरबदल होतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0 Comments