मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीनंतर उदयनराजे यांनी १६ तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.
‘आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे’ असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.’संभाजीराजे यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. पण आमचा मार्ग हा एकच आहे’ असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं.
‘या देशाची फाळणी करायची आहे का, असा माझ्या राज्य आणि केंद्रावर आरोप आहे. २३ मार्चला जीआर काढून आरक्षण दिलं जात आहे. मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दुफळी निर्माण केली जात आहे’ असा आरोपही उदयनराजे यांनी केला.
‘व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजामध्ये दुफळी निर्माण होईल, आम्ही कोणतेही कृत्य कधी केले नाही. कोर्टात काय होईल, काय निर्णय येईल, याकडेच यांचं लक्ष आहे. यांना समाजाशी काही घेणे देणे नाही. व्यक्ती केंद्रीत राजकारणी झाले आहे. आज यामुळे मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला तर याला सरकारच जबाबदार राहणार आहे. मी आणि संभाजीराजे सुद्धा तेव्हा काही करू शकणार नाही. आमच्यावर सुद्धा घणाघात हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे अशी वेळ येऊ देऊ नका’ असा इशाराही राजेंनी दिला.
‘जेवढे राज्यकर्ते आहे ना आजपर्यंत त्यांना खूप मुभा दिली आहे. आपण निवडून आलो आहे, त्यांना खूप काही वाटतंय. आता या लोकशाहीतील या राजे म्हणून घेणाऱ्यांनी नीट वागले पाहिजे. माझं तर म्हणणं आहे, यांना गाडलं पाहिजे. वाटलं तर माझ्यापासून सुरुवात करा. माझ्याकडे जशी विचारणा करणार आहात, तसंच प्रत्येक आमदार आणि खासदाराला याचा जाब विचारला पाहिजे’ असंही उदयनराजे म्हणाले.
‘टीका करणे असेल तर तो त्यांचा विचार आहे. हाताची बोटं ही सारखी नसता. माझ्या विधानाशी तुम्ही सहमत असावे, असं माझं म्हणणं नाही. मी जे काही बोललो ते भाजपला सुद्धा लागू आहे, असंही उदयनराजे म्हणाले.
‘ही केंद्राची जबाबदारी नाही, तर राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. विशेष अधिवेशन बोलावून एकदा काय ती चर्चा होऊ द्या, सभागृहात ही लोकं एक बोलता आणि बाहेर भलतंच बोलता. त्यामुळे या सरकारने आधी निर्णय घेऊन दाखवावा, नंतर केंद्रासोबत काय बोलायचं आहे ते मी पाहिल’ असंही उदयनराजे म्हणाले.
0 Comments