✒️उमेश बापूसाहेब सुतार
चिंचवाड , ता. करवीर , जि. कोल्हापूर
( ८८८८ ०३ ३४२१ )
सरकारला मायबाप म्हटलं जातं . अस्मानी-सुलतानी संकट आली की आगतिक डोळे मायबाप सरकारची कृपा होईल म्हणून आस लावून डबडबलेले असतात . भुकेच्या जखमेवर मायबाप सरकार फुंकर मारेल हीच अपेक्षा असते त्या भाबड्या डोळ्यांची ... इतिहासाची पानं चाळल्यानंतर ही स्वैर अपेक्षा अधिक तीव्रतेने जाणवते . दुष्काळ, महापूर , रोगराई व महामारी या काळात गलितगात्र झालेल्या दीनदलितांना आधार देणाऱ्या किमयागार महामानवांना इतिहासाने कायमच काळाच्या सिंहासनाचे अढळ स्थान बहाल केले आहे .
वर्तमानात कायमच इतिहासाची पुनरावृत्ती होत असते . फक्त त्या घटनेचा चेहरा बदलतो इतकच ! , वुहान शहरातुन बाहेर पडलेला कोरोनाव्हायरस आज जगाला पोखरत चालला आहे . त्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वांची जन्मभूमी , कर्मभूमी त्याच्या गडद सावलीमुळे भयग्रस्त आहे . शासनाकडून ठोस निर्णयाची वानवा आहे , कोणताही कृती कार्यक्रम नाही . अशा संकटसमयी सरकारने लोकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक असतं पण आज वस्तुस्थिती विरोधाभासी आहे .
पुढील ओळी तर खूपच सुचक आहेत ..
प्रत्येक निर्णयाला लाचारीची किनार आहे
अन ही व्यवस्था श्रीमंतांची वेठबिगार आहे
भुकेसाठी जी पावले रक्ताळली रस्त्यावरी
त्या भुमिपुत्रांची ही लोकशाही कर्जदार आहे
इतिहास हा कायमच वर्तमानाला दिशादर्शक असतो फक्त गरज असते भूतकाळ , वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचे सांधे जोडण्याची .. वर्तमानाचा संदर्भ इतिहासाशी जोडल्याशिवाय काही प्रश्नांची उकल होत नसते याच भान वर्तमानवीरांना असाव लागत . त्यांच्या चिकित्सक नजरांनी इतिहासाचे उत्खनन करायला हवं . इतिहासाच्या खजिन्यामध्ये चिरंतन प्रेरणा देणारा असाच एक तेजस्वी ऐवज आहे , तो ऐवज म्हणजे राजर्षी शाहू चरित्र ..
राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरची सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या तीन वर्षात प्लेग रोगाने कोल्हापूरचे दार ठोठावले . राजर्षी शाहू नावाच्या तेजपुरुषासमोर नवे आव्हान उभे राहिले . सुरवातीच्या काळात रोगावर कोणतेही निदान नसल्यामुळे दरवर्षी न चुकता अशा संसर्गाचा सामना करावा लागे . प्राप्त आकडेवारीनुसार दरवर्षी नऊ ते दहा हजार बळी जात . संस्थानांतील शिरोळ व गडहिंग्लज भागात १८ खेड्यातून ३०,००० पेक्षाही अधिक लोक प्लेगच्या छायेखाली वावरत होते हे सारे संदर्भ या रोगाची भीषणता व्यक्त करतात .
कोणत्याही संकटावेळी केवळ पोकळ भाषणाने आणि तकलादू आश्वासनाने प्रश्न सुटत नसतात . तर त्यासाठी गरज असते एका कृती कार्यक्रमाची आणि त्याच्या कठोर अंमलबजावणीची हे राजर्षी शाहूंनी आपल्या निर्णयातून दाखवून दिलं .
प्लेग हा संसर्गजन्य रोग ;आणि मुंबईप्रांत त्याच्या सर्वाधिक प्रभावाखाली , त्यामुळे कोल्हापूर संस्थानामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांकडून प्लेगची साथ पसरू नये यासाठी दळणवळणाच्या मार्गावर त्यांची तपासणी व्यवस्था करण्यात आली . ज्या भागामध्ये या रोगाची लागण आहे तिथून कोणीही बाहेर येऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या. गर्दीमुळे प्लेगची साथ पसरेल म्हणून तीर्थक्षेत्र ज्योतिबाची जत्रा बंद करण्याच पत्रक संस्थांनाकडून प्रकाशित करण्यात आलं . दररोज रेल्वेने येणाऱ्या उतारूंच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या .
प्लेग रोग हा देवाचा प्रकोप आहे , अशी अंधश्रद्धा लोकांमध्ये वाढते आहे हे राजांनी तात्काळ हेरलं आणि गावागावांमध्ये संस्थानाने स्वतः विकत घेतलेली माहितीपत्रके वाटण्यात आली . निरक्षरता मोठ्या प्रमाणात होती म्हणून प्रत्येक गावांमध्ये त्या सूचनांच वाचन करण्यात आले . प्लेग रोगाच्या नियंत्रणासाठी रघुनाथराव व्यंकोजी सबनीस आणि भास्करराव जाधव या दोन कर्तबगार व्यक्तींची नेमणूक प्लेग कमिशनर या पदावर करण्यात आली .
लोकराजा या न्यायाने खेडेगावांमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी कृती कार्यक्रम आणि प्रबोधन असे दुहेरी सूत्र राजांनी स्वीकारले . गावामध्ये प्लेग रोगी असेल तर त्याचे नाव कळविणाऱ्याला ५ ते १५ रुपयांचे बक्षीस देण्याची तरतूद केली . अधिकारी वर्गाने हुकुमांचे पालन केले नाही तर त्यांचे उत्पन्न बंद करण्याचा आदेश दिला गेला . आणि एक - दोघांवर त्याची कडक कारवाई सुद्धा केली . खेडेगावातील लोकांवर पहारा ठेवण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची गरज होती , म्हणून लोकांची भरती केली गेली . अगदी रोगग्रस्त भागांमध्ये जाण्याला पोस्टमनला सुद्धा बंदी केली गेली .. लागण झालेल्या लोकांसाठी गावाबाहेर झोपड्या बांधणे बंधनकारक केले , त्यासाठी गरीब लोकांना साहित्य सुद्धा संस्थांनाकडून मोफत पुरवण्यात आलं पण इतरांना मात्र ( गरीब वगळता ) ते विकत दिलं गेलं .
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचं तंतोतंत उदाहरण म्हणजे लोकांना आरोग्याच्या सोई पुरवण्याच्या उद्देशाने कोटीतीर्थ या भागात उभारण्यात आलेल हॉस्पिटल . सुरुवातीच्या काळात लस आणि औषध उपलब्ध नव्हती , होमिओपॅथीमध्ये प्लेग वर उपचार असल्याची माहिती मिळताच शाहूराजांनी सार्वजनिक दवाखाना काढला , हा देशातील पहिला सार्वजनिक दवाखाना होता .
खरा लोकनेता तोच जो आपल्या प्रजेला भावनाप्रधान न करता वस्तुनिष्ठ करेल . राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्येक निर्णयात , त्याच्या अंमलबजावणीत भावनेला प्राधान्य नव्हतं तर लोककल्यानाला प्राधान्य होत .
प्लेगची लस टोचून घेण्यासाठी लोकांच्या रूढी आणि अंधश्रद्धा आड येऊ लागल्या तेंव्हा महाराजांनी स्वतः लस टोचून घेण्यास सर्वांना उद्युक्त केल . इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी घरातल्या सर्वांसकट स्वतः लस टोचून घेतली . लस घेण्यासाठी संस्थानातील नोकरांना तीन दिवसांची रजा देण्यात आली . श्रमाचे काम करणाऱ्यांसाठी प्रत्येकी आठ आण्याचे बक्षीसही देण्यात आले .जे संस्थांचे नोकर नव्हते त्यांना चार आणे बक्षीस दिले गेले .
संकटातून संधी निर्माण करा अशा पल्लेदार वाक्यांनी टाळ्या मिळू शकतात पण गुंता सुटत नाही हे आजच्या राज्यकर्त्यांना कळण्यासाठी शाहू राजांनी केलेले कृतिकार्यक्रम अभ्यासणे गरजेचे आहे . सुरवातीच्या टप्प्यात कोल्हापूर शहरात दोघांना प्लेगची लागण झाली होती , तात्काळ उपाययोजना केल्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पुढचा रोगी सापडला नाही याला तत्परता म्हणतात . ज्या १८ गावात प्लेगचा रोगी सापडला ती गावेच्या गावे रिकामी केली गेली . आणि त्यांना शेतांमध्ये कौरंटाईन केलं गेलं . याच काळामध्ये मजुरांना कळंबा तलावावर राहण्याची सोय केली होती . बेरोजगारीचा प्रश्न भयाण होता , महाराजांनी तलावाच्या कामातून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला . दुष्काळाच्या काळात धान्य आयात करून स्वस्त धान्याची दुकाने काढली . शेतकऱ्यांना सारामाफी देवून जनावरांसाठी स्वस्त वैरणीची सोय केली . अशांना रोजगार मिळावा म्हणून रस्ते , तलाव व विहीर यांची कामे रोजगार हमी स्वरूपात चालू केली . प्लेगपूर्व आणि प्लेगकाळात आलेल्या दुष्काळामध्ये देशभरात भूक बळींची हजारोंनी नोंद झाली पण शाहू संस्थानामध्ये एकही भूकबळीची नोंद नाही , हा शाहू महाराजांच्या आपत्तीनिवारणाचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा पुरावा म्हणता येईल.
आजच्या कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये राजर्षि शाहूंचा आपत्ती व्यवस्थापनाचा पॅटर्न शासनाला नक्कीच दिशादर्शक ठरेल . आपल्या संस्थानामध्ये एकही भूकबळी न होऊ देता , लोकांना रोजगार उपलब्ध करून देत राजर्षी शाहूंनी प्लेग रोगावर यशस्वी मात केली . ही दूरदृष्टी आजच्या शासनकर्त्यांनी स्वीकारायला हवी . लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवेत , प्रसंगी अधिक कठोर व्हायला हवं .
येणाऱ्या काळाचा विभत्स चेहरा सर्वानाच प्रश्नांकित करतो आहे . त्याच्या दाहकतेकडे कानाडोळा करण्याची भली मोठी किंमत वर्तमान आणि भावी पिढीला मोजावी लागेल . त्यामुळे सर्वांनीच सजग व्हावं लागेल . बऱ्याच समस्यांची उकल शासन निर्णयात असल्याने शासनाला तमाम जनसमुदायाच पालकत्व स्वीकारावं लागेल आणि अशा अंधाऱ्या काळात निर्णय प्रक्रियेतील प्रत्येकाच्या पावलापुढे उजेड पेरत जाईल माझ्या लोकराजाचे चरित्र ... राजर्षी शाहू चरित्र ...
( संदर्भ साहित्य -
१) लेख - प्लेग व दुष्काळ यांच्यावर
केलेली मात
लेखक - प्रा . ब .शी. कुलकर्णी
( डॉ.रमेश जाधव संपादित
राजर्षी शाहू गौरव ग्रंथ या ग्रंथातून)
२) शाहु स्मारक ग्रंथ
संपादक- डॉ .जयसिंगराव पवार
३) धनंजय कीर लिखित
राजर्षी शाहू चरित्र )
0 Comments