मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा - नाना पटोले


मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे, परंतु वैफल्यग्रस्त भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नुकत्याच उजेडात आलेल्या पत्रात केंद्रीय तपास यंत्रणा त्यांना त्रास देत असल्याचा उल्लेख आहे, असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असे ही ते म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments