लाचप्रकरणी “या” अपर तहसीलदारासह तालाठ्यास अटक!


सांगली: अवैधपणे मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाई टाळण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अपर तहसीलदार आणि तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अप्पर तहसीलदार हनुमंत म्हेत्रे आणि तलाठी विशाल विष्णू उदगिरे अशी अटकेतील लाचखोरांची नावे असून, सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार दि. २२ रोजी दुपारी जत तालुक्यातील संख येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संख येथे मातीची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर अपर तहसीलदार आणि तलाठ्यांकडून कारवाई करण्याचे काम सुरू होते. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी काही वाहने जप्त केली होती. वाहने परत घेऊन जाण्यासाठी अधिकार्‍यांकडून लाचेची मागणी सुरू होती. याबाबत तक्रारदाराने पाच जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अपर तहसीलदार हणुमंत म्हेत्रे आणि तलाठी विशाल उदगिरे यांनी तक्रारदारांकडे अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

सबळ पुरावे मिळताच लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी संख येथील तलाठी कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रार दाराकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना अप्पर तहसीलदार हनुमंत मेहेत्रे आणि तलाठी विशाल उदगिरे या दोघांना रंगेहात अटक करण्यात आले. दोन्ही लाचखोरांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले आदींनी ही कारवाई केली आहे. यामुळे जत तालुक्यातील अवैध माती, मुरूम आणि वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

0 Comments