बार्शी/प्रतिनिधी:
कोरोना महामारीच्या काळामध्ये सततच्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यावसायिकांना बरोबर शेतकऱ्यावरही खूप मोठे संकट कोसळलेले असतानाच बार्शी तालुक्यातील मौजे मांडेगाव येथील शेतकरी महादेव मिरगणे यांच्यावर जाणून-बुजून आणलेल्या संकटामुळे बार्शी परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
कडक अशा भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई असताना सुद्धा मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने तयार केलेला ढोबळी मिरचीचा प्लॉट रुबाबात डौलत असतानाच, कुणीतरी कपट कारस्तानाने घाला केला आणि प्लॉट जळून खाक झाला. शेतकरी महादेव मिरगणे यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्रीच्या सुमारास फवारणीसाठी आपल्या शेतातील प्लास्टिक बॅलरमध्ये पाणी भरून ठेवून गावाकडे निघून गेले. सकाळी लवकरच शेतामध्ये जाऊन साडेतीन एकर मिरची ची फवारणी करून घेतली. आणि दुपारनंतर पाहतो तर काय एक एक मिरचीचे झाड हळूहळू सुकून त्याचे पाने गळायला सुरुवात झाली.
हा प्रकार कशामुळे होऊ लागला हे त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांनी खत व औषध दुकानदारांना फोन करून लागलीच बोलावून घेतले. कृषी क्षेत्रातील काही तज्ञ मंडळी त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर सर्वांच्या परीक्षण आणि निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली कि, फवारणी करण्यासाठी भरून ठेवलेल्या पाण्याचा बॅलरमध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तननाशक औषध मिसळण्याचे लक्षात आले. कर्ज काढून आणि उदारीवर खाते आणि औषधे आणून, जवळपास ३ लाखाच्या आसपास खर्च केलेला, भर उन्हाळ्यामध्ये आपल्या लहान लेकरांसारख सांभाळणी केलेला, त्या प्लॉटमधील मिरची तोडणीसाठी तयार होत असतानाच, तो मिरचीचा प्लॉट डोळ्यासमोर जळत असताना शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू देखील अनावर झाले.
सर्व बाजूंनी संकटात असलेल्या बळीराजाला आणखीन किती संकटाला तोंड द्यावे लागणार ? अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कोणी न्याय देणार का ? कष्टाने उभा केलेल्या पिकाचे नुकसान मिळणार का ? शेतकरी कर्जमुक्त होणार का ? अश्या प्रकारच्या चर्चा करत हळहळ व्यक्त करणारे शेतकरी तालुक्यामध्ये चिंतेत दिसत आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, असे अघोरी कृत्य करणाऱ्या आणि बळीराजाला जाणून-बुजून संकटात आणणाऱ्या समाजकंटकाला त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करून कडक शिक्षा करावी अशी मागणी शेतकऱ्याचे वतीने करण्यात आलेली आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments