एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध सुधारत असतानाच राऊत यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते जळगावात आले होते. यावेळी शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला.
शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. राऊत यांच्या या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राऊत यांनी केलेल्या या आरोपावर भाजप काय उत्तर देते त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. त्यामुळे ठाकरे-मोदी संबंध सुधारत असून त्याचा पर्यायाने भाजपलाच फायदा होणार असल्याचं चित्रं होतं. मात्र, राऊत यांच्या या विधानाने त्यात मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आणि यशस्वी होऊ. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. आम्ही ती निश्चित पूर्ण करू, अस ते म्हणाले.
त्या भेटीवर सूचक विधान
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीसंदर्भातही भाष्य केले. प्रशांत किशोर हे कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. त्यांचे काम वेगळ्या प्रकारचे असते. त्यांना आम्ही सुद्धा अनेकदा भेटलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण भेटले आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी आमच्यासाठी तसेच काँग्रेससाठी पण काम केले आहे. ते एक प्रोफेशनल राजकीय रणनीतीकार आहेत.
जर एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते त्यांना भेटून चर्चा करत असतील तर ते त्यांच्या पक्ष कार्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा केली असेल, असं सांगतानाच प्रशांत किशोर आणि शरद पवारांची (political leader) भेट ही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
0 Comments