शिवसेना नेते प्रताप सरनाईकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शिवसेनेनी पुन्हा युती करावी असं सरनाईकांनी या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पुन्हा जुळवून घ्यावे असं ते म्हणाले.
सरनाईक आपल्या पत्रात म्हणतात:
"पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि इतर महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी अनेक नेत्यांचे वैयक्तिक संबंध आणि जिव्हाळा कायम आहे. ते अजून तुटण्यापूर्वी जुळवून घेतलं तर बरं होईल."
पत्रातील गंभीर मुद्दे
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असं भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. काँग्रेसनं एकिकडं 'एकला चलो' अशी भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेते-कार्यकर्ते फोडून शिवसेनेलाच हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप सरनाईकांनी पत्रातून केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची कामं लवकर होतात, पण आपला मुख्यमंत्री असूनही आपली कामं लवकरत होत, नाहीत असं अनेक शिवसैनिकांचं मत असल्याचं सांगत सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंपर्यंत ही नाराजी थेटपणे पोहोचवली आहे. ''महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि सनदी अधिकारी चौकश्या मागे लागू नये म्हणून, केंद्रातील सत्ताधारी पक्षाबरोबर आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,'' असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
तपास यंत्रणा या शिवसेनेच्या नेत्यांच्याच मागे हात धुवून लागल्या आहेत, याचा उल्लेख करताना प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांवर आरोप केले आहेत.
भाजपबरोबरची युती तोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मोठं करण्यासाठी 'महाविकास आघाडी' स्थापन केली की काय? असा उल्लेखही या पत्रात आहे.
0 Comments