भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा पुस्तकाचे मुंबईत बुधवारी प्रकाशन ; यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला शरद पवारांच्या हस्ते कार्यक्रम



कोल्हापूर/प्रतिनिधी : ज्येष्ठ कुस्ती समालोचक पै. शंकरराव पुजारी (कोथळीकर) यांनी लिहिलेल्या भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा या पुस्तकाचे बुधवारी (ता. १६) मुंबईत प्रकाशन होत आहे. ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा. शरदरावजी पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला हा कार्यक्रम बुधवारी (ता. १६ जून) रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही माहिती आज येथे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, तेजस प्रकाशनाचे रावसाहेब पुजारी यांनी येथे दिली. कोरोनामुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

"कुस्ती मराठी मातीच्या अस्मितेचा रांगडा मर्दानी खेळ. शेकडो वर्षांची परंपरा आणि अनेकांना घडविणारी कुस्ती गेल्या काही वर्षांत मरगळलेली होती. तिच्यात जान फुंकण्याचे आणि मुकी कुस्ती बोलकी करण्याचे काम कुस्ती ज्येष्ठ समालोचक पै. शंकरराव पुजारी (कोथळीकर यांनी आपल्या समालोचनातून केले. ३२ वर्षांत ५००० मैदानावर त्यांचा आवाज घुमतोय. कुस्ती विश्वाचे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे पै. शंकरराव पुजारी (अण्णा).

त्यांनी लिहिलेले भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा हे पुस्तक कोल्हापुरातील तेजस प्रकाशन प्रकाशित करते आहे. गेल्या ६० वर्षांतील समकालीन कुस्ती विश्वाचे समग्र चित्रण या पुस्तकात सचित्र मांडलेले आहे. भारतीय कुस्तीची परंपरा, महाराष्ट्राने घडविलेले हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरीचे मानकरी, गाजलेल्या कुस्त्या, गाजणारी कुस्ती मैदानं. नव्या दमाचे उभरते पैलवान, जुन्या पैलवानांविषयीच्या आठवणी, मैदानावरील रोचक किस्से, कुस्ती विश्वाचे बदलते स्वरूप यांचा सपुर्ण थांडोळा सचित्र, रंगीत पारदर्शिकतून यामध्ये मांडलेला आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग पै. शंकरराव पुजारी यांच्या आत्मचरित्राचा आहे. त्यांनी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. त्यांची जडणघडण यामध्ये रेखाटलेली आहे. कुस्तीप्रेमी, अभ्यासक आणि नवोदितांसाठी एक दुर्मिळ ग्रंथ यानिमित्ताने साकारलेला आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रस्तावना लाभलेली आहे.

Post a Comment

0 Comments