लाल डबा नव्हे लाल परी ; आज तुझा त्र्याहत्तरावा वाढदिवस


गाव तिथे एस.टी. या बिरूदाला जागणारी तू.. दुर्गम भागापासून महानगरांपर्यंत गेल्या सत्तर वर्षात तुझी सेवा कधीही न घेतलेली व्यक्ती विरळीच असेल. ती तूच होतीस, जिने आम्हाला मे महिन्यात, दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला पोहचवलंस. तिथला आनंद मनमुराद लुटू दिलास. तुच चाकरमान्याला त्याच्या कामावर, गणेशोत्सवात त्याच्या घरी तर लाखो विद्यार्थ्यांना शाळेला-परीक्षेला वेळेवर सोडताना कधीही कुरकुरली नाहीस. गावोगावी रात्री येणारी मुक्काम गाडी म्हणजे दुसर्‍या दिवशी प्रवाशांना वेळेवर इच्छित स्थळी पोहचण्याची हमी. सारा गाव बंद दारामागे निवांत निद्राधीन झालेला असताना अशा मुक्काम गाड्यातले चालक-वाहक मात्र रात्रभर डास, किड्यांच्या सानिध्यात आपल्या रात्री घालवत आले आहेत. केवढी मोठी सेवा आहे ही.. तिचे मोल होणार नाही. 
     
तुझ्या केबिनमधून जेवणाचे कित्येक डबे रोज लांबचा प्रवास करत कामाच्या ठिकाणी भुकेल्या कामगारांना, वसतीगृहातील विद्यार्थ्यांना घरचा मायेचा घास भरवत राहिले. उर्जा देत राहीले. नवदाम्पत्यांची वऱ्हाडं तुच दुर गावी असलेल्या लग्नस्थळी अगदी मुहूर्तावर पोहचवलीस. कधी अडलेल्या गर्भारशी भगिनींची तु बऱ्याचदा सुटकाही केलीस. त्यांना माहेरचा आधार दिलास. 
  
कोकण असो वा परमुलूख.. पार्सलांची ने-आण तु अलगद केलीस. हव्या त्या वस्तू अलगद आमच्याकडे सोपवल्यास. आम्हाला शालेय सहलींद्वारे जणू जगभ्रमंती घडवून आणणारी तुच होतीस. प्रासंगिक करार केला की, कमी पैशात परवडणारी सहल. लाल डबा म्हणून हिणवणारे, तुला टुकटुक करून वडापमधुन भुर्रकन पुढे जाणारे तुला नेहमी भेटले. पण तु राग न धरता प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेला वसा नेहमीच जपलास. म्हणूनच तु आम्हांला कायमच आपली वाटलीस. तुझ्यातून केलेला प्रवास नेहमीच सुरक्षित वाटला.

 आज तुझा त्र्याहत्तरावा वाढदिवस. ऊन, वारा, पाऊस असला तरीही न कुरकुरता सिंगल बेल, डबल बेलच्या तालावर दौडत राहिलीस. तु आमच्यासाठी लाल डबा नाहीस, तर लाल परीच राहशील. तुला खूप सार्‍या शुभेच्छा! 
   
महाराष्ट्राची लाडकी एसटी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची. हजारो कर्मचारी तिन्ही ऋतूत प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र झटताहेत. काहीशी अडचणीत सापडलेली ही एसटी लवकरच पुनर्मार्गावर येऊन सुवर्णकाळ अनुभवू दे, याच एका प्रवाशाकडून सदिच्छा..!  

✒️ अ‍ॅड.विजयसिंह शिंदे (सोशल मीडियावरून साभार)

Post a Comment

0 Comments