'मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सगळा गाढवपणा हा सरकारने केला आहे. सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मोर्चा हा मुक मोर्चा नसेल, तो बोलका असेल, आम्ही सळो की पळो करून सोडणार' अशा शब्दांत मराठा संघटनेचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी टीका केली.
पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.'सारथीच्या संस्थेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पीएएचडी करणाऱ्या २३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नाही. विद्यार्थी संकटात आहेत, एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाने एमफील बंद केल्यामुळे पीएचडी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी एक मागणी आहे. १ जूनला विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येईल असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मेटे यांनी दिली.
'बार्टीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना सारथीतही मदत करावी. सारथीत ५ ते ६ कर्मचारी आहेतय १३९ कर्मचारी कामावर घेण्याचे अधिकार मिळाले आहेत, इथं भरती केली जाईल. अजित पवारांना विचारले असता त्यांनी आज सारथीच्या अध्यक्षांना सांगितलं आहे. सारथी संस्थेला स्वतःची जागा मिळवण्याचं काम अजित पवारांनी केलंय. अजित पवारांनी ४१ कर्मचारी अधिकारी भरण्यास मान्यता दिली आहे', असंही मेटे म्हणाले.
'काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओबीसीचा नेता व्हायची घाई झाली आहे. त्यांच्या काही बोलण्याला किंमत नाही', अशी टीकाही मेटे यांनी केली.छत्रपती संभाजी महाराज चांगले काम करत आहे. अजूनही त्यांनी भूमिका घेतलेली नाही. ते २७ तारखेला भूमिका घेतील मात्र ते काम चांगलं करत आहे. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर भूमिका घेऊ, असंही मेटेंनी स्पष्ट केले.
५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच!
दरम्यान, 'मराठा आरक्षण संदर्भात ५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच', अशी ठाम भूमिका आमदार विनायक यांनी घेतली असून या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी ५ जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून पाच तारखेला मोर्चा होणारच, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.
0 Comments