कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या आयपीएल स्पर्धेचा यंदाचा हंगाम अखेर रद्द करण्यात येत असल्याची घोषणा 'बीसीसीआय'चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केली.
कोलकत्ता नाईट रायडर्सचे खेळाडू कोरोनाबाधित आढळून आल्याने आयपीएल स्पर्धा धोक्यात आली होती. स्पर्धेचे सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार असल्याचीही शक्यता याआधी वर्तवली जात होती. मात्र, आता राजीव शुक्ला यांनी 'एएनआय'ला दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा 'सीझन'च रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून, त्याचा आयपीएललासुद्धा फटका बसला आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे 'आयपीएल सीझन' रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राजीव शुक्ला यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे सोमवारी (ता.३) रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर आजच्या सामन्यावरसुद्धा कोरोनाचे संकट ओढावले होते. त्यामुळे अखेर स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चेन्नई-कोलकात्यापाठोपाठ हैदराबाद आणि दिल्लीच्या २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात हैदराबादचा विकेटकिपर वृद्धीमान साहा, दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर अमित मिश्रा हादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कोलकाता संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर यांच्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
0 Comments