आयपीएल-२०२१ स्पर्धा कोरोनामुळे धोक्यात आली आहे. कोलकाता नाइट राइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघात आज (ता.3) सामना होणार होता. मात्र, या सामन्यापूर्वी केकेआर संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
कोरोनाच्या सावटाखाली यंदाची आयपीएल स्पर्धा होत आहे. त्यामुळे खेळाडूसाठी कडक बायोबबल केले होते. त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू केली होती. मात्र, त्यानंतरही कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय काही खेळाडूंची तब्बेत बिघडल्याचे वृत्त होते. कोरोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
'बीसीसीआय'च्या अधिकाऱ्यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले, की "कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आली. त्यामुळे आजचा सामना लांबणीवर टाकला आहे."
मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे अॅडम झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय हे कोरोनाच्या भीतीने मायदेशी परतले होते. त्यानंतर आर. अश्विनने घरच्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर त्यांचे संघात पुनरागमन झालं होत.
खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण
वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. देशातील कोरोनाची स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
0 Comments