अनैतिक संबंधातून बहिणीच्या मुलाचा पाण्यात बुडवून खून

पुणे :

सख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने बहिणीच्या मुलाचा पाण्यात बुडवून खून केला.पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.

खून झालेल्या मुलाचे नाव चाकेन अवधेश वर्मा (वय ३ वर्षे), असे असून याप्रकरणी अवधेश धनीराम वर्मा (वय २७ वर्षे, रा. युनी वास्तू इंडिया कंपनी, लेबर कॅम्प, मार्केट यार्ड गेट जवळ) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन आरोपी महिला निर्मला कैलास वर्मा (वय २२ वर्षे) हिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटकही केली आहे.

 आरोपी निर्मला हिला आपल्या बहिणीचे आणि नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.निर्मला वर्मा हीने १ मे रोजी घराजवळ खेळणाऱ्या चाकेनला उचलले आणि बांधकाम साईटजवळ असणाऱ्या एका पाण्याच्या खड्ड्यात फेकून दिले. यामध्ये पाण्यात बुडाल्याने चाकेनचा मृत्यू झाला.

सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना एका ठिकाणी निर्मला ही चाकेन याला घेऊन जाताना दिसली. पण, परत येताना एकटीच होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी निर्मला हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने या कृत्याची कबुली दिली. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments