महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याला धक्का देणारं चित्र; सोलापुरात जमली हजारोंची गर्दी


सोलापूर/प्रतिनिधी:

राज्यात करोना संकट अद्यापही टळलेलं नसल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यादरम्यान अनेक जिल्ह्यांनी परिस्थितीनुसार निर्बंध कडक केले आहेत. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. नुकतंच सोलापुरात महाराष्ट्राला करोना लढ्याला धक्का देणारी घटना समोर आली आहे.

सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचं नुकतंच निधन झालं. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्यने लोकांनी गर्दी केली होती. राज्यात एकीकडे करोना संकट असल्याने लॉकडाउन लावण्यात आलेला असतानाही लोकांनी तुफान गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीसमोर पोलीसही हतबल झाल्याचं चित्र होतं.

सुशील कुमार शिंदे यांचे समर्थक म्हणून देखील करण म्हेत्रे यांची ओळख होती. सोलापूर जिल्ह्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही करण म्हेत्रे यांचं पार्थिव मोदी स्मशानभूमीच्या दिशेने नेलं जात असताना मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्याचं पहायला मिळाले.

सोलापूरमधील सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत हा परिसर येतो. पण गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस कमी पडल्याचं दिसत होतं. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने करोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं.

Post a Comment

0 Comments