सोलापूर/प्रतिनिधी:
जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा इतर जिल्ह्यांपेक्षा सुरळित होत असून लसीव्यतिरिक्त कोणताही तुटवडा नाही. लसीकरणाच्या बाबतीत सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या केंद्राप्रमाणे सोयी-सुविधा, लसीकरणाचे नियोजन करून ‘वॅक्सिन ऑन कॉल’ पद्धती जिल्हाभर राबविण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.
जिल्ह्यातील कोविड-१९ आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाचे डॉ. प्रसाद यांच्यासह आयएमएचे प्रतिनिधी, खाजगी दवाखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. भरणे यांनी सांगितले की, आयुर्वेदिक महाविद्यालयातील लसीकरण केंद्र आदर्श आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना एकत्र आल्यानंतर काय घडू शकत, याचं हे उदाहरण आहे. लसीकरण कक्ष, डाटा एन्ट्री, नोंदणी विभाग, पाणी, रूग्णांना बसण्याची व्यवस्था आणि येणारे रूग्णांसाठी सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन याठिकाणी होत आहे. नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस नियोजनानुसार दिला जातोय, ज्यांचा दुसरा डोस असेल त्यांना फोनद्वारे बोलावून घेतले जात आहे, यामुळे गर्दी टाळली आहे. याप्रकारे जिल्हाभर नियोजन करा. दररोजच्या लसीकरणाची क्षमता वाढवा.
तिसऱ्या लाटेची शक्यता धरून ऑक्सिजन, बेड उपलब्धता, कोविड केअर सेंटरची व्यवस्था करा. खाजगी दवाखान्यात बेड शिल्लक असताना डॅशबोर्डवर दाखवित नाहीत, टीमद्वारे तपासणी करून अशा दवाखान्यांवर कारवाई करा. ऑक्सिजनच्या बाबतीत 58 मेट्रीक टन पुरवठा होत आहे. कमतरता वाटली तर आणखी मागणी करावी. खाजगी दवाखान्यांनी मागणी केल्यास त्वरित ऑक्सिजन प्लान्टला मान्यता द्यावी, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार असून जिल्ह्याला जास्तीत जास्त कोरोनाचे डोस मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पहिला व दुसऱ्या डोसचे योग्य नियोजन करा. लॉकडाऊननंतर रूग्णसंख्या कमी होत असली तर मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा. सर्व यंत्रणेने समन्वयाने काम करून करमाळा, माळशिरस, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील रूग्णसंख्या कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी आजार अंगावर काढू नये, त्वरित दवाखान्यात तपासणी करून उपचार घेतले तर मृत्यू येत नाही, हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील लॉकडाऊन (कडक निर्बंध) उद्या संपत असला तरी पुढचे १५ दिवस शासकीय लॉकडाऊन आहे. या काळात रूग्णांची साखळी तोडण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडक पालन करावे. ग्रामीण भागातील भाजी विक्रेते एकाच ठिकाणी येणार नाहीत, याची दक्षता घेऊन उपाययोजना करा. जनतेच्या महत्वाच्या अडचणी होणार नाहीत, याकडेही लक्ष द्या. पावसाळ्यापूर्वीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.
शहरबाबतच्या स्थितीचे श्री. शिवशंकर, ग्रामीण डॉ. जाधव यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. श्री. शंभरकर म्हणाले, ऑक्सिजनचा जिल्ह्यात तुटवडा नाही. तीन प्लान्ट खाजगी दवाखान्यात सुरू होत आहेत. सिव्हील हॉस्पिटल ए आणि बी ब्लॉक येथे प्लान्ट बसविण्यात येणार असून त्यामधून ४५० ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होणार आहेत.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गावागावात कोविड केअर सेंटर सुरू केले असल्याने नागरिक तपासणी करण्यासाठी येत आहेत. यामुळे आजार लपविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आयएमएचे अध्यक्ष श्री. शहा यांनी मनपाने ऑक्सिजन प्लान्टसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी. लसीकरणासाठीही आयएमएचे डॉक्टर योगदान देण्यास तयार असल्याचे सांगितले.
0 Comments